वासांबे मोहोपाडा येथे पावसाळापूर्व नालेसफाई सुरू

। रसायनी । वार्ताहर ।
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायती क्षेत्रातील गावांत पावसाळ्यापूर्वी गटारांची सफाईची कामे सुरू झाली आहेत. बाजारपेठ आणि दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी सफाई करताना गटारांत वाळू, मातीबरोबरच प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्यांचा कचरा निघत आहे.
राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या वापरावर बंदी घातली आहे. तरीही अनेक व्यापारी, नागरिक प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास करताना दिसत आहे. हेच प्लास्टिक नाले आणि गटारांत फेकले जात असतात. मोहोपाडा, नवीन पोसरी बाजारपेठेत तसेच दाट लोकवस्ती असलेल्या मोहोपाडा, नवीन पोसरी, रीस, नवीन रीस आदी ठिकाणी नालेसफाई करताना पाणी आणि शितपेयांच्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या सापडत आहेत. या वस्तू अडकून राहत असल्याने गटारे तुंबतात. सध्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व गटारसफाईचे काम सुरू झाले आहे. अशा प्रकारे प्लास्टिक कचरा नाले-गटारांत निघत असल्याने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीचे ग्रामपंचायतीने कडक धोरण केले पाहिजे, असे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे.

Exit mobile version