महाड नगरपालिकेचा अकार्यक्षम कारभार
| महाड | प्रतिनिधी |
महाड नगरपालिकेकडून सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील नालेसफाई आणि खड्डे भरण्याची प्रक्रिया कागदावरच पूर्ण केली आहे. यामुळे शहरात जागोजागी पाणी साचत असून, खड्ड्यांमधून नागरिकांना वाट काढत जावे लागत आहे. तर, घरातील नालेदेखील सफाई न केल्यामुळे गटारामध्ये पाणी तुंबून राहात आहे.
ऐतिहासिक महाड शहरामध्ये बहुतांश रस्ते दहा वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रिटमध्ये करण्यात आलेले आहेत. तर, जोडरस्ते आणि इतर रस्ते सध्या काँक्रिटमध्ये करण्यात आले. मात्र, जुन्या काँक्रिट रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने खड्ड्यांमधून पाणी साचून राहात आहे. त्यातच महाड नगरपालिकेकडून सध्या अंतर्गत नाले आणि पिण्याच्या पाण्याच्या लाईनची कामे सुरू आहेत. या कामांकरता जागोजागी खोदकाम करण्यात आलेले आहे. सदर काम पूर्ण होण्यास पुढील किमान दोन वर्षे तरी लागतील असा अंदाज असल्याने खड्डे पडलेल्या रस्त्यांवर दुरुस्ती करण्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक टाळण्यात आले आहे. तर पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याची कामे करणे अपेक्षित असतानादेखील पालिकेच्या सुस्त अधिकाऱ्यांमुळे ही कामे करण्यात आलेली नाहीत.
महाड शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून, इतर अंतर्गत आणि जोड रस्त्यांवर येण्याच्या पाण्याच्या लाईनचे काम सुरू असल्याने केलेल्या खोदकामामुळे खड्डे पडून पाणी साचून राहिले आहे. रस्त्यांवरील पाणी गटारामध्ये जाण्यासाठी पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करणे अपेक्षित असतानादेखील कोणत्याच प्रकारची कामे मे महिन्यामध्ये करण्यात आलेली नाहीत. यामुळे खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचीदेखील शक्यता आहे. उभा मारुती या ठिकाणी उभा मारुती ते कोटेश्वरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे तयार झाले आहेत. वारंवार तक्रार करूनदेखील अद्याप खड्डे बुजवण्यात आलेले नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. हीच अवस्था शहरातील अनेक रस्त्यांवर असल्याने वाहन चालवताना वाहन चालकांना त्रास होत आहे.
महाड शहरांमधून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते यावर्षी मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने नालेसफाई अद्याप करण्यात आलेली नाही. जागोजागी नाल्यांमधून अनेक ठिकाणी कचरा साचून राहिला आहे. यामुळे गटार आणि नाल्यातील पाणी पुढे सरकत नसल्याने हे सांडपाणी गटारा मधून साचून राहत आहे. यामुळे एन पावसाळ्यात डासांचा देखील त्रास वाढला आहे. पालिका प्रशासनाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करून आहेत. शहरात विविध ठिकाणी रस्ते, नाले, आणि बगीच्यांची दुरुस्तीची कामे सुरू असल्याने या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील विविध ठिकाणी अशा प्रकारे पाणी साचून राहत असल्याने वाहन चालकांना देखील त्रास होत असून या खड्ड्यांतून जाणाऱ्या वाहनांमुळे ादचाऱ्यांवर देखील पाणी उडण्याचे प्रकार घडत आहेत. या सुस्त अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.