खादी कपड्यांना पसंती

लग्न सराईत खादी कपडे परिधान

| अलिबाग । प्रमोद जाधव ।

नवनवीन फॅशनचे कपडे बाजारात दाखल होत असताना आजही तरुणाई हातमागपासून तयार केलेले खादी कपडे वापरण्यावर अधिक भर देत आहेत. वेगवेगळ्या लग्न सराईत खादी कपडे परिधान करण्याला तरुणाई पसंती देत आहेत. खादी कपडे खरेदीचा कल तरुणाईमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खादी कपडयांना बाजारात प्रचंड मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

पुर्वी शिवलेले कपडे जास्त घालते जात होते. त्यानंतर रेडीमेंड कपडे परिधान करण्यास सुरुवात झाली. वेगवेगळ्या फॅशनची जीन्स, रेडीमेंड कपड्यांच्या खरेदीचा कल प्रचंड होता. परंतू वजनाने हलके, कोणत्याही हंगामात सहज वापरता येणारे, मुलायम असल्याने खादी कपड्यांकडे ग्राहक आकर्षित होऊ लागला आहे. गेल्या पाच सहा वर्षापासून जिल्ह्यातील बाजारांमध्ये खादी महोत्सवाचा क्रेझ दिसून येत आहे. अलिबासह, पेण, पनवेल या शहरांमध्ये खादी महोत्सव मोठ्या प्रमाणात भरत असल्याचे चित्र आहे. हातमागापासून तयार केलेला खादीचा कुर्ता, लेडीज कुर्ता, ड्रेस मटेरियल, मुलांसाठी धोती-कुर्ता, हातमागावर विणलेल्या साड्या खादी महोत्सवातून दिसून येत आहेत. विशेष म्हणजे कुर्ता, जॅकेट, शॉर्ट कुर्ता, हाफ शर्ट अशा प्रकारचे कपडे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून परिधान केले जात असल्याने खादी उत्सवाला अशा प्रकारच्या कपड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.



तरुणाईसह सर्वच वयोगटांमध्ये खादीचे कपडे वापरण्यावर भर दिला जात आहे. खादी वस्तू भांडारामध्ये विविध रंगी शर्ट, जॅकेट घेण्यास पसंती मिळत आहे.

खादी फुल शर्ट, शॉर्ट हाफ कुर्ता, नेहरु फुल कुर्ता, कडक खादी फुल शर्ट, खादी हाफ शर्ट, खादी साडी, नेहरु कुर्ता, मोदी जॅकेट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांची खरेदी करीत आहेत. या कपड्यांची विक्री जोरात होत आहे.

25 -35 वयोगटातील ग्राहक शॉर्ट कुर्त्याला तर 40- 60 वयोगटातील ग्राहक जॅकेट, कुर्ता या खादी कपड्यांना पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे जॅकेट व कुर्ता या प्रकारचे खादी कपडे लोकप्रिय होत आहेत. वेगवेगळ्या लग्न समारंभात, सांस्कृतिक कार्यक्रम, सभांमध्ये खादी कुर्ता, जॅकेट वापरण्यावर ग्राहक अधिक भर देत आहेत. त्यामुळे खादी कपड्यांची खरेदीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या हातमागावर तयार होणारे खादी कपडे वापरण्याचा ट्रेंड वाढत आहे. सध्या उन्हाचे चटके वाढत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी खादी कपडे फायदेशीर ठरत आहेत. खादी महोत्सवात उपलब्ध असलेले खादीचे कपडे खरेदी करून ते कपडे वापरण्यावर ग्राहक अधिक पसंती दर्शवित आहेत.

Exit mobile version