ग्रामीण भागात चुलींना पसंती

गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ
। तळा । वार्ताहर ।
दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे भाव देखील गगनाला भिडले असून घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरामुळे तळा तालुक्यातील ग्रामीण भागात मातीच्या चुलींना नागरिकांची अधिक पसंती मिळत आहे.
घरगुती गॅसच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केली असली तरी गॅस सिलेंडरचे दर अद्यापही वधारलेलेच आहेत. शहरी भागातील बहुतांश महिला वर्ग सुशिक्षित असल्याने तसेच त्यांना जंगलातून लाकडे आणून चूल पेटविण्याची सवय नसल्यामुळे नाईलाजाने गॅस सिलेंडरचाच वापर करतात. परंतु ग्रामीण भागात शेतकरी महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे बहुतांश कुटुंबांनी गॅस सिलेंडर सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक बनविण्यास सुरुवात केली आहे.
सतत चुलीजवळ बसणार्‍या महिलांच्या फुफ्फुसात कार्बन गेल्याने त्यांच्या आरोग्याची हानी होते. ही हानी टळावी यासाठी 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्वला योजना सुरू केली होती. मात्र धुरमुक्त स्वयंपाक घर या केंद्र सरकारच्या संकल्पनेला दरवाढीमुळे छेद बसला असून योजनेचा पूर्णतः बोजवारा उडाला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यातील नागरिकांनी गॅस सिलेंडर व शेगडी अडगळीत टाकून पुन्हा चुलीचा वापर करण्याला पसंती दिली आहे.

Exit mobile version