। माणगाव । प्रतिनिधी ।
पावसाळा संपल्यानंतर सर्वसामान्यांना वेध हिवाळ्याचे आणि गुलाबी थंडीचे लागतात. गेल्या काही दिवसांपासून हिवाळ्याची चाहूल लागली असून दाट धुके व थंडी पडत आहे. यामुळे आरोग्याविषयी जागरूक असणार्या सर्वसामान्य नागरिकांनी हलक्याफुलक्या व्यायामाला सुरुवात केली असून बागेतून, रस्त्यांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी, उघड्या मैदानावर पहाटेच्या धुक्यात चालणे व व्यायामाला सुरुवात केली आहे.
हिवाळा आणि आरोग्य यांचे जवळचे नाते आहे. हिवाळा ऋतू आरोग्यासाठी उत्तम समजला जातो. या दिवसात मोठ्या प्रमाणात उत्तम आरोग्यासाठी अनेकजण व्यायाम व आहार याकडे लक्ष देत असतात. हवेत असणारा किंचित गारवा, दाट धुके यामुळे आल्हाददायक वातावरण असते. पहाटे पडणार्या धुक्यात चालणे, हलकासा व्यायाम करणे हे अनेकांना आवडत असते. आरोग्याविषयी जागरूक असणारे नागरिक हिवाळी दिवसांत हमखास घराबाहेर पडून व्यायामाला प्राधान्य देत असतात.
गेल्या काही दिवसांपासून थंडी पडत असल्याने आरोग्यप्रेमींनी सकाळच्या वेळामध्ये चालणे, सूर्यनमस्कार, योगा, व्यायाम, सर्वांगसुंदर व्यायाम, शरीराच्या विविध हालचाली या बाबी करण्याकडे लक्ष दिले जात आहे. तरुण, वयोवृध्द, महिला तसेच विद्यार्थी हलक्या फुलक्या व्यायामाला प्राधान्य देत असून सकाळ, संध्याकाळ आरोग्य हमखास घराबाहेर पडताना दिसत आहेत.
थंडीच्या दिवसांत शरीराला ऊब आणि अतिरिक्त ऊर्जेची आवश्यकता असते. तसेच, शरीराचे रक्ताभिसरण चांगले होण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. आयुर्वेदातही हिवाळ्यातील व्यायामाला महत्व दिले आहे.
– शोभा धायगुडे, योग शिक्षिका
थंडीच्या दिवसांत व्यायाम आवश्यक आहे. थंड वातावरण व धुके यामुळे एक आल्हाददायक वातावरण असते. अशा वातावरणात मन प्रसन्न होते. तसेच, शरीर निरोगी व सुदृढ राहण्यासाठी या दिवसांत व्यायाम करत असतो. प्रत्येकाने या दिवसांत व्यायाम करणे आवश्यक आहे.
– काशिनाथ गाणेकर, व्यायामप्रेमी