डोक्यात गॅस सिलिंडर घालून हत्येचा प्रयत्न; उलवेतील पतीला अटक
| पनवेल | प्रतिनिधी |
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन गर्भवती पत्नीवर धारदार चाकूने वार करत तिच्या डोक्यात गॅस सिलिंडर घालून हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उलवे सेक्टर 19 मधील बालाजी होम सोसायटीत घडली. या प्रकरणी आरोपी पती निखिल सामंत (25) याला पोलिसांनी अटक केली आहे. निखिल हा पत्नी भारती सामंत (24) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करत असल्याची माहिती आहे. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने गर्भवती भारतीवर चाकूने वार केले. त्यानंतर तिच्या डोक्यात गॅस सिलिंडर घालून हल्ला केला. या हल्ल्यात भारतीच्या मानेवर, गळ्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्या असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशुतोष देशमुख करीत आहेत.
