अवकाळीचा आंबा, वीट व्यवसायाला फटका

श्रीवर्धन येथील व्यवसायिक चिंतेत
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
दिवाळी सणानंतर थंडीची चाहूल लागण्याऐवजी अवकाळी पडणार्‍या पावसामुळे तालुक्यात आंबा व वीट व्यवसायिकांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दोन वर्षांपूर्वी निसर्ग चक्रिवादळात पडझड झालेल्या आंब्यांच्या झाडांना या वर्षी काही प्रमाणात मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मोहरावर कुठल्याही प्रकारची किड पडायला नको म्हणून बागायतदारांनी कीटकनाशकांची फवारणीला सुरुवात केली आहे. सध्या तालुक्यात पडत असलेला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आलेला मोहर काळा पडायला लागला असुन झाडांवर बुरशी व तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. चक्रिवादळात झालेल्या नुकसानाची अद्यापही काही बागायतदारांना भरपाई मिळालेली नसताना ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस या निसर्ग निर्मित संकटांमुळे बागायतदार पुन्हा हवालदिल झाला आहे.
अवकाळी पावसाचा फटका वीट उत्पादकांना बसला आहे. जांभा दगड बाजारात आल्यापासून वीटांची काही प्रमाणात मागणी घटली असतांना कोरोना व वादळामुळे वीट व्यवसायावर मंदीचे सावट आले आहे. दिवाळी सणानंतर तालुक्यात वीट व्यवसायिकांनी वीटभट्टी लागणारा कच्चा माल घेऊन ऑर्डर प्रमाणे उत्पादनास सुरुवात केली. कच्च्या वीटा भट्टीवरती रचुन ठेवल्या. परंतु, अवकाळी पावसामुळे वीटा व कच्चा माल यांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले.

Exit mobile version