‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’, ‘पोलीस मन’ या पुस्तकांचा समावेश
| अलिबाग | वार्ताहर
लेखिका वर्षा कुवळेकर लिखित ‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’ आणि लेखक अजित देशमुख लिखित ‘पोलीस मन’ या दोन्ही पुस्तकांना मानाचा असा ‘दत्तात्रेय कृष्णा सांडू-चेंबूर’चा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. ओघवत्या, पण सरळ आणि सोप्या भाषेत लिहिलेल्या दोन्ही पुस्तकांचे लेखक अलिबागचेच आहेत.
आफ्रिकेतील केनिया देशातील नैरोबी या शहराला भेट देऊन आलेल्या वर्षा कुवळेकर यांच्या ‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’ या पुस्तकाला, तर आयुष्याची 35 वर्षे पोलीस सेवेत व्यतीत करुन एसीपी म्हणून निवृत्त झालेल्या राष्ट्रपती पदक विभूषित अजित देशमुख यांनी लिहिलेल्या ‘पोलीस मन’ या पुस्तकालाही हा पुरस्कार मिळाला आहे. खाकी वर्दीत असलेल्या आपल्या समाजरक्षण करणार्या पोलिसांनाही मन-भावना-कुटुंब-नातीगोती असतात आणि कर्तव्य निभावताना त्याचं तारतम्य बाळगावे लागते याचे दृश्यवर्णन श्री. देशमुखांनी त्यांच्या पुस्तकात केले आहे. असाच कीर्तीमान पुरस्कार यापूर्वीही श्री. देशमुखांच्या पुस्तकाला सर्वद फाऊंडेशन यांच्यातर्फे प्राप्त झाला आहे.
वर्षा कुवळेकर या गृहिणी आहेत. त्यांचे हे दुसरे पुस्तक असून, ‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’ या पुस्तकाला यापूर्वी मराठी साहित्य परिषदेचा ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’, सर्वद फाऊंडेशनचा ‘स्टार पुरस्कार’ आणि सारांश मासिकातर्फे ‘साहित्य पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. अलिबागकरांना अभिमान वाटेल असा साहित्य पराक्रम देशमुख व वर्षा कुवळेकर यांनी केल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.