थेट सरपंचासाठी सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला
| तळा | वार्ताहर |
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतीमध्ये तळा तालुक्यातील एकमेव रहाटाड ग्रामपंचायत येत असल्यामुळे येथे सर्व राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असताना मात्र राजकीय पक्षांनी सरपंच यावेळेस पुन्हा जनतेतून निवडला जाणार असल्यामुळे सावध भूमिका घेत सर्वसमावेशक, जनतेच्या हिताची कामे करणारा चेहरा शोधण्यास सुरवात केली आहे.
रहटाड ग्रामपंचायतीत गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे वर्चस्व आहे. परंतु मागील काही महिन्यात पुलाखालून बरेच पाणी गेले असून, भारतीय जनता पार्टीने येथे चंचू प्रवेश केला आहे. मागील पाच वर्षापूर्वी थेट सरपंचपदी निवडून आलेले चांगदेव पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे येणार्या निवडणुकीत भाजपा येथे स्पर्धेत राहणार असल्याचे बोलले जात आहे. रहाटाड येथे शिवसेनेचे देखील मतदार असून, भाजपा आणि शिवसेना एकत्र झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील ही ग्राम पंचायत पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. एकंदरीत, राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी जोमाने उतरणार असून, सध्या रहाटाड ग्रामपंचायतीकडे सर्वांनी लक्ष वेधले आहे.






