मुर्तींची शंभर टक्के बुकींग; कापडी फेटेवाला गणरायाचा ट्रेंड
| अलिबाग | प्रमोद जाधव |
गणरायाचे आगमन येत्या 27 ऑगस्टला होणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या आकाराची, उंचीची मुर्ती बुकींगदेखील करण्यात आली आहे. यंदा कापडी फेटेवाला गणरायांचा ट्रेंड असल्याचे मुर्ती विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. वेगवेगळ्या रंगाचे फेटे, भरजरी कापडी धोतरला यावर्षी पसंती असल्याचे चित्र आहे.
काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. घरोघरी रंगरंगोटी करण्याबरोबरच आसन सजावटीचे साहित्य, विद्यूत रोषणाई, पताके खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली आहे. बाप्पाचे आगमन बुधवारी (दि.27) होणार आहे. त्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. गणेशमुर्ती कोणत्या प्रकारची असावी, यासाठी गणेश भक्तांनी मुर्तीच्या दुकानात जाऊन मुर्ती पसंतदेखील केल्या आहेत. शंभर टक्के बुकींगदेखील झाली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्तींचा ट्रेंड असतो. यावर्षी कापडी फेटे व भरजरी धोतर असलेल्या गणेशमुर्तींचा ट्रेंड असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा मुर्तींना अधिक मागणी आहे. भक्तांच्या सुचनेनुसार गणेशमुर्तीला कापडी धोतर व फेटे बसवण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या मुर्ती खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.
मुर्तींच्या किंमतीमध्ये 20 टक्क्यांनी वाढ
पीओपी मुर्ती वजनाने हलक्या व हाताळण्यास सोप्या असल्याने अनेकांकडून या मुर्तींना मागणी आहे. यावर्षी मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्यामुळे मूर्तींच्या किंमतीमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुर्तीमागे पाचशे ते हजार रुपये अधिक मोजण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. दीड फुटाच्या मुर्तीची किंमत 3 हजार 200, दोन फुटाच्या मुर्तीची किंमत 5 हजार रुपये तर पाच फुटाच्या मुर्तीची किंमत 20 हजारहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.







