| ठाणे | प्रतिनिधी |
ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळेल हे जवळपास स्पष्ट असले तरी पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळेल याविषयी अजूनही संभ्रम कायम आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले राजन विचारे यांनी मात्र महिनाभरापासूनच प्रचार सुरू केला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे हे येत्या सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात हे शक्तिप्रदर्शन करायची तयारी ठाकरे गटात केली जात आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर भागातून नेते, पदाधिकारी तसेच, कार्यकर्त्यांना सोमवारी ठाण्यात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतरच राजन विचारे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पुढे जाणार आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची सुत्र एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. राजन विचारे यांना ठाकरे गटाकडून ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीमध्ये शिवसेनेकडे ही जागा गेली असल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून उमेदवाराबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराबाबत अद्यापही संभ्रम आहे. तर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी प्रचारास सुरूवात केली आहे. 29 एप्रिल या दिवशी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी ते जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन करायची तयारी ठाकरे गटात केली जात आहे.