। अलिबाग । प्रमोद जाधव ।
चौल-भोवाळे येथील यात्रेची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शनिवार (दि.14) पासून यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेत येणार्या भाविकांसह संपूर्ण यात्रेच्या सुरक्षेसाठी रेवदंडा पोलीस सज्ज झाले आहेत. चौल भोवाळे येथील चोरी प्रकरणानंतर पोलीस सतर्क झाले असून यावर्षी सीसीटीव्ही कॅमेरांसह अनेक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
रेवदंडा परिसरातील चौल-भोवाळे येथे दत्तजयंतीनिमित्त 14 डिसेंबरपासून यात्रेला सुरुवात झाली आहे. 18 डिसेंबरपर्यंत ही यात्रा राहणार आहे. या पाच दिवसात लाखो पर्यटक व भाविक दर्शनासाठी येणार आहेत. खाद्य पदार्थांपासून घरगुती, खेळाच्या साहित्यांची दुकाने या यात्रेत उभारण्यात येणार आहेत. मागील दोन वर्षापुर्वी दत्तमंदिरातील चांदीचे प्रभावळ चोरीला गेले होते. त्याचा तपास अद्याप लागला नाही. त्यामुळे यंदा यात्रेमध्ये पोलिसांनी अधिक सर्तकता राखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी टेहळणी कक्ष व पोलीस मदत कक्ष बांधण्यात येणार आहे. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत अशा अनेक ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकूण 80 पोलीस त्याठिकाणी नेमण्यात आले आहेत. त्यामध्ये अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश असणार आहे. गर्दीमध्ये महिलांची छेडछाड करणार्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महिला छेडछाड विरोधी पथक नेमण्यात आले आहे. 24 तास ही यंत्रणा तैनात राहणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांनी दिली.
दर पाऊण तासाने एसटी बस
चौल- भोवाळेमधील यात्रेला सुरुवात होत आहे. भाविकांना यात्रेबरोबरच दर्शनासाठी वेळेवर पोहचता यावे, यासाठी अलिबाग एसटी बस आगारामार्फत जादा एसटी बस फेरीची व्यवस्था करण्यात आली आहे. चौल यात्रा स्पेशल या बसेस सुरु करण्यात येणार आहेत. दर पाऊण तासाने बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेमध्ये एसटी महामंडळाचे कक्ष असून त्या ठिकाणी कर्मचारी तैनात केले जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी दिली.