चवदार तळ्याच्या स्मृतीदिनाची प्रशासनाकडून तयारी

महाड पत्रकार संघाकडून समस्यांवर चर्चा

| महाड | प्रतिनिधी |

महाड मधील ऐतिहासिक चवदार तळे स्मृतिदिन 20 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने महाडमध्ये येणार्‍या भीमसैनिकांना कोणत्याच प्रकारची अडचण होऊ नये म्हणून स्थानिक पालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. याबाबत प्रशासनाच्या बैठकीमध्ये विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी महाड पत्रकार संघाकडूनदेखील विविध समस्यांवर चर्चा येऊन सूचना मांडण्यात आल्या.चवदारतळे सत्याग्रहाच्या स्मृतीदिनासाठी केल्या जाणार्‍या तयारीबाबत लवकरच विविध सामाजिक, राजकीय संघटनांचीदेखील एक बैठक आयोजित केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित असलेल्या महाड पत्रकार संघाच्या सदस्यांनी विविध विषयावर चर्चा करत असताना चवदार तळ्यावर शैक्षणिक सहलींचा ओघ वाढला आहे, हे निदर्शनास आणून देत येणार्‍या वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, त्याचप्रमाणे 20 मार्च रोजी भीमसैनिकांची मोठी गर्दी महाडमध्ये होते. अशावेळी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने महाड शहरालगत म्हाडा ग्राउंड आणि गांधारी पुलानजीक वाहनतळ निर्माण करावे, अशा प्रकारच्या मागण्या देखील केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या लावल्या जातात त्याठिकाणी धातूचे पात्र ठेवण्यात यावे. समोरील मार्गावर चटई टाकण्यात यावी, अशी मागणी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार यांनी केली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकात कोकणे, राजेंद्र जैतपाळ, महेश शिंदे, श्रीकांत सहस्रबुद्धे, उदय सावंत यांनी देखील विविध समस्या मांडून या समस्यांचे निराकरण पालिकेने करून भीमसैनिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली.

Exit mobile version