| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अध्यात्म, भक्ती, श्रद्धेसोबतच आनंद व जल्लोष घेऊन येणारा ख्रिस्त समाजातील नाताळ हा पवित्र सण म्हणून ओळखला जातो. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी प्रभू येशुंचा जन्म दिवस म्हणून जल्लोष साजरा केला जातो. यंदा गुरुवारी (दि.25) नाताळ आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील बाजारपेठा सांताक्लॉजचे लहान मोठे बाहुले, टोप्या, क्रिसमस ट्री अशा अनेक वस्तूंनी सजल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चर्च, घरे, वाड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सजावट करण्यात आली आहे. त्याची लगबग ठिकठिकाणी दिसून येत आहे.
डिसेंबर महिना उजाडल्यानंतर अनेकांना नाताळसह सरत्या वर्षाला निरोप देण्याची चाहूल लागते. रायगड जिल्ह्यामध्ये अलिबागसह अनेक तालुक्यांमध्ये विशेष म्हणजे मूरूड तालुक्यात ख्रिस्ती समाज आहे. सध्या जिल्ह्यामध्ये नाताळ सणाची तयारी जोरात सुर आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आहे. सजावटीच्या साहित्यांना बाजारपेठा सजल्या आहेत. सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग आहे.
दरम्यान, ख्रिस्त जन्माच्या देखाव्यासाठी गोठे, दिव्यांच्या माळा, सांताक्लॉजचे चित्र, बाहुले, टोप्या, प्रभू येशू आणि मेरीच्या मुर्तींना ग्राहकांकडून प्रचंड मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील सेंटमेरीसह अनेक शाळांमध्ये सांताक्लॉज, त्यांचे मुखवटे व क्रिसमस ट्री खरेदी करून सजावट करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकांकडून यामध्ये सक्रीय सहभाग दिसून आला आहे. सांताक्लॉजचे पेहराव करण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच, जिल्ह्यातील वेगवेगळ्या चर्चमधील प्रार्थना सभागृहात सजावट करण्यात आली आहे. विद्यूत रोषणाईसह वेगवेगळ्या आकारातील रंगांची फुले लावण्यात आली आहेत. यावेळी गुरुवारी होणाऱ्या नाताळच्या दिवशी सकाळी प्रार्थना घेतली जाणार आहे. त्यावेळी अनेकांना गोड पदार्थ देऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. तसेच, सायंकाळी वेगवेगळे सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची महिती देण्यात आली आहे.
नाताळ निमित्त रोषणायीसह सजावटीची तयारी
