जिल्हाभर चिटणीस मंडळाचा दौरा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
2 ऑगस्ट रोजी खालापूर येथे होणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, संपूर्ण रायगड जिल्ह्यात पक्षाच्या जिल्हा चिटणीस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा नियोजन दौरा सुरू झाला आहे. तालुकानिहाय सभा, बैठका आणि कार्यकर्त्यांशी थेट संवादातून वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या सोहळ्यास सुमारे 15 हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा विश्वास शेकापचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी व्यक्त केला.
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 2 ऑगस्ट रोजी खालापूर येथे शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे नियोजन आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी तसेच जिल्हा चिटणीस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा तालुकानिहाय दौरा सुरू करण्यात आला आहे.
या दौऱ्याची सुरुवात बुधवारी (दि. 22) पोलादपूर येथून झाली. त्यानंतर महाड, माणगाव, तळा आणि श्रीवर्धन तालुक्यांमध्ये बैठका घेण्यात आल्या. गुरुवारी (दि. 23) कर्जत, खालापूर, पेण, रोहा आणि मुरूड तालुक्यांचा दौरा करून विविध ठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या. या सभांमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधत वर्धापन दिनाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या दौऱ्यात शेकाप नेत्या तथा रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, अतुल म्हात्रे आणि प्रमोद घासे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. जिल्हाभर सुरू असलेल्या या सभा आणि बैठकींना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पक्षाच्या वर्धापन दिनाबाबत कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
22 जुलैपासून सुरू झालेल्या या दौऱ्याचा समारोप 27 जुलै रोजी होणार आहे. त्या दिवशी सकाळी 10 वाजता शेतकरी भवन येथील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता उरण आणि दुपारी 2 वाजता पनवेल येथे दौरा होणार असल्याची माहिती जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी दिली. या सर्व बैठकींना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
