मुरुड शहरात गौरी आगमनाची लगबग; बाजारपेठ सजल्या

। मुरुड-जंजिरा । प्रतिनिधी ।

गौरीपूजन हा महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते. गौरी पूजांसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी मुरुड बाजारपेठेत गर्दी झाली आहे.

गौरीच्या स्वागतासाठी घराघरात महिलांची लगबग सुरू झाली आहे. गौरीचे वैशिष्ट्यपूर्ण मुखवटे, असंख्य प्रकारचे दागिने, साड्या आणि सजावट साहित्यांनी सजलेल्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांची दिवसभर वर्दळ दिसून आली.

मुरुड शहरासह पंचक्रोशी भागात तेरड्याची गौर बघायला मिळते. भाद्रपद सप्तमीच्या दिवशी सायंकाळी महिला तेरड्याची रोपे मुळासकट काढून आणतात. ‘गौरी इल्यो’ असे म्हणत त्यांचे स्वागत केले जाते. तेरड्याची मुळे म्हणजेच लक्ष्मीची पावले मानली जातात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच अष्टमीला महापूजा व नवमीला वाजत-गाजत मिरवणुकीने गौरी विसर्जन केले जाते.

Exit mobile version