| उरण | प्रतिनिधी |
माघी गणेशोत्सव 22 जानेवारी रोजी मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी उरण तालुक्यातील चिरनेर, सोनारीसह इतर गावांमध्ये सुरू असून कला केंद्रांमध्ये आता लाडक्या बाप्पांच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याचे काम ही अंतिम टप्प्यात आले आहे. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या माघी गणेशोत्वासाठी श्री गणपती देवस्थान विश्वस्त मंडळ चिरनेरने मंदिर परिसरात आकर्षक मंडप डेकोरेशन सुरु केले आहे. तसेच सोनारी येथील सिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सन 2026 या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे.
गणेशभक्तांमध्ये माघी गणेश जयंतीला एक वेगळे महत्त्व असून राज्यातील विविध भागांत मोठ्या थाटामाटाने ती साजरी केली जाते. यंदा गुरुवार दि.22 जानेवारी रोजी गणेश जयंती आली असून त्याआधी भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.चिरनेर गावातील जागूत अशा श्री महागणपती मंदिरांमध्ये माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जात असून हजारो भाविक या दिवशी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत.त्यात उरण तालुक्यातील सोनारी, उरण शहर, केगांव विनायक, बोकडविरा, खोपटा, दिघोडे-रानसई, नागाव या गावातील मंदिरात ही मोठ्या भक्तिभावाने, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
चिरनेर गावातील श्री गणपती देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, मंगेश पाटील, अमर ठाकूर, सुजित पाटील, किरण भाकुर्लेकर सह इतर विश्वस्त, गाव कमिटीचे सदस्य यांनी मंदिर परिसरात जय्यत तयारी सुरू केली आहे. तसेच सोनारी गावातील श्री सिद्धिविनायक देवस्थानचे पदाधिकारी तुकाराम कडू, राकेश कडू, दिनेश तांडेल सह गणेशोत्सव मंडळाचे इतर सदस्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत.







