पनवेल मनपाची 89 जागांसाठी आरक्षण सोडत

। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिकेच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकांची तयारी अंतिम टप्यात आहे.राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादी आणि आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार शुक्रवारी ( दि.5) 89 जागांसाठी आरक्षण सोडत क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात सकाळी 11 वाजता ही सोडत निघणार आहे.राजकीय पक्षांचे लक्ष या सोडतीकडे आहे.

बुधवारी राज्यमंत्रिमंडळाने 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्याप तो निर्णय पनवेल महानगरपालिकेला निवडणूक आयोगाकडून लेखी स्वरूपात न आल्याने पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार शुक्रवारी ही आरक्षण सोडत होणार आहे. यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नव्या रचनेनुसार एकूण 30 प्रभाग असून 89 जागांसाठी आरक्षण सोडत पार पडणार आहे.

आरक्षण सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग,अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,सर्वसाधारण आणि 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आदी सोडत जाहीर होणार आहे. निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार राहणार्‍या उमेदवारांचे भवितव्य प्रभाग आरक्षणावर आधारित आहे.त्यामुळे अनेकांचे लक्ष या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. दि.6 ते 12 ऑगस्ट दरम्यान या आरक्षणावर हरकती व सुचना मागविण्यात येणार आहेत तर 13 ऑगस्ट रोजी प्रभाग निहाय मतदार यादी जाहीर होणार आहे.दि.20 रोजी अंतिम आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. दि.2 सप्टेंबर रोजी प्रभाग निहाय आणि अंतीम प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

अद्याप आमच्याकडे राज्य निवडणूक आयोगाकडून कोणताही आदेश न आलेला नाही. त्यामुळे आम्ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेत आहोत.

विठ्ठल डाके (उपायुक्त, निवडणूक विभाग )

Exit mobile version