महामार्ग अर्धवट तरी टोलनाका बनविण्याची तयारी

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातून जाणार्‍या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. या महार्गाचे कर्जत तालुक्यात आरसीसी काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. मात्र या रस्त्याचे रुंदीकरण तसेच काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट आहे. तरीदेखील या रस्त्याने वाहतूक करणार्‍या वाहनांना टोल लावण्यासाठी टोलनाके बनविले जात आहेत. दरम्यान,आधी रस्ता पूर्ण करा आणि नंतरच टोलनाके उभारा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या रस्त्याचे बांधकाम करणार्‍या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.


मुंबई- पुणे समृद्धी महामार्गसाठी कनेक्टिव्हीटीसाठी बनविण्यात आलेल्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्ग 548 अ चे कर्जत तालुक्यातील आणि खालापूर तालुक्यातील काम अर्धवट आहे. कर्जत तालुक्यात मुरबाड तालुक्यात बाटलीचीवाडी येथे हा रस्ता प्रवेश करीत असतो तर डोलवली येथे हा रस्ता खालापूर तालुक्यात प्रवेश करतो. कर्जत तालुक्यातुन साधारण 52 किलोमीटरचा रस्ता असून खालापूर तालुक्यात खोपोली येथे हा रस्ता पुढे पाली रस्त्याने वाकण येथे हा रस्ता पनवेल-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो. कर्जत तालुक्यात कळंब येथे दोन ठिकाणी या रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्याचवेळी पुढे सुगवे गावाजवळ देखील चिल्लार नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूला हा रस्ता अर्धवट आहे. कर्जत तालुक्यातील नांगुर्ले गावाजवळ देखील हा रस्ता स्थानिकांनी बांधकाम करू न दिल्याने अर्धवट आहे. तर पळसदरीच्या वळणावर देखील रस्त्याचे काम झालेले नाही. तर पळसदरी पासून पुढे रस्त्याच्या का लेनचे काम झाले नाही. तेथे स्थानिक वाहनचालक यांना अपघात होण्याची शक्यता असून मानकीवली गावाच्या पुढे देखील हाळ फाट्यापर्यंतचा रस्ता देखील काँक्रीटीकरण झालेला नाही.असे असताना देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून रस्त्यावर वाहनांसाठी टोल लावण्याची धडपड सुरु आहे.पळसदरी येथे एमएसआरडीसी कडून टोल नाका बनविण्याचे काम सुरु आहे. तसेच कर्जत तालुक्यातील भागूचीवाडी उताराजवळ देखील एमएसआरडीसी कडून टोलनाका उभारण्याच्या हालचाली सुरु आहेत. 35 किलोमीटर नंतर एक असे टोलनाके बनविले जात असतात,त्यामुळे शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामृगी रस्त्यावर टोलनाके बनविले जाणार आहेत. अर्धवट रस्त्याच्या पूर्णतः होण्यासाठी आणि रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोवर कुठेही टोलनाके सुरु नका अशी मागणी करणारे निवेदन मनसेच्या वतीने एमएसआरडीसीच्या पनवेल येथील कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले आहे.

Exit mobile version