। अलिबाग । वार्ताहर ।
राज्यात तापमानाचा पारा चढलेला असताना हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती त्यानुसार आज सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाच्या हलक्या सारी कोसळल्या. मुंबईसह रायगडातील अन्य तालुक्यात अवकाळी पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली त्याचबरोबर चाकरमान्यांचेही हाल झाले.
दरम्यान, भारतीय हवामान खात्यानं यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांत विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे. तसेच 30-40 किमी प्रतितास वेगाने हे वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान खात्याने केले आहे.
रायगडात अवकाळी पावसाची हजेरी
