प्रशासनाकडून विशेष निधीची आवश्यकता; गडप्रेमींच्या नितांत स्थानिक सहभागाची गरज
। उरण । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राच्या इतिहासाचा गौरवशाली ठेवा आहेत. त्यांच्याशी केवळ आपल्या स्वराज्याच्या आठवणी जोडलेल्या नाहीत, तर त्या बालेकिल्ल्यांनी अनेक ऐतिहासिक क्षणांची साक्ष दिली आहे. मात्र, आज अनेक किल्ल्यांंची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शासनाकडून संवर्धनासाठी काही योजना जाहीर केल्या जातात, मात्र निधीचा योग्य विनियोग आणि अंमलबजावणी याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही.
महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, ज्या किल्ल्यांंनी इतिहास घडवला, त्या किल्ल्यांंची योग्य जपणूक होण्यासाठी सरकारने अधिक ठोस पावले उचलण्याची गरज आहे. हे किल्ले फक्त पर्यटनस्थळ नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यामुळे किल्ल्यांंच्या संवर्धनासाठी खालील उपाययोजना तातडीने राबवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना किल्ल्यांचे महत्त्व समजावे, यासाठी शालेय अभ्यासक्रमात विशेष प्रकल्प समाविष्ट करावेत. योग्य पर्यटन सुविधा विकसित करून गडांना भेट देणार्या पर्यटकांची संख्या वाढवावी आणि त्यातून मिळणारा महसूल संवर्धनासाठी वापरावा.किल्ल्यांंवरील अवैध हॉटेल, दुकानं आणि अन्य व्यावसायिक उपक्रमांवर बंदी घालावी.
किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी कडक कायदे लागू करून दोषींवर कठोर कारवाई करावी. महाराजांचे गडकिल्ले भविष्यातही आपल्या इतिहासाची जिवंत साक्ष राहतील, यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यायला हवेत. केवळ घोषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीतूनच हे किल्ले टिकतील. सरकारसोबतच स्थानिक प्रशासन, गडप्रेमी आणि नागरिकांनीही पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या इतिहासाचा हा महत्त्वाचा ठेवा जतन करण्यासाठी पुढे यायला हवे. ही केवळ संस्कृती आणि परंपरेची जपणूक नसून, महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.