भारतीय संस्कृतीचे जतन महत्त्वाचे: पंडित पाटील

| अलिबाग | वार्ताहर |

आपली भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ असून, कलेच्या माध्यमातून ती टिकून आहे. या भारतीय संस्कृती आणि कलेचे जतन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार पंडित पाटील यांनी केले. सचिन धुमाळ यांच्या सचिन धुमाळ म्युझिक अकॅडमीच्या ‘वंदन’ या सांगितीक कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.


पांडवादेवी येथील पाटील ब्रदर्स हॉल येथे झालेल्या ‘वंदन सोहळा गुरूभक्तीचा’ हा कार्यक्रम रविवारी पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर कमळ पतसंस्थेचे श्रीनिवास पाटील, सामाजिक कार्यकर्ते आल्हाद पाटील, धामणपाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण म्हात्रे, के.डी. पाटील, जगदीश पाटील, ॲड. साळुंखे, ॲड. मानसी म्हात्रे, चार्वाक जगताप, राजन माशेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्ज्वलन व ज्योती कलश झलके हे गीत संपन्न झाले. बासरीवरील राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी सचिन धुमाळ म्युझिक अकॅडमीच्या 60 विद्यार्थ्यांनी बासरीवर विविध रागांचे सादरीकरण तसेच विविध तालांवर पखवाजवादन सादर केले. या कार्यक्रमाला कमळ नागरी पतसंस्थेने आणि बांधकाम उद्योजक विवेक पाटील यांनी अर्थसहाय्य केले. कार्यक्रमात राजन माशेलकर, चार्वाक जगताप, सचिन धुमाळ यांच्या जुगलबंदीने रसिकश्रोते मंत्रमुग्ध झाले. यावेळी शहाबाज पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागात असंख्य कलाकार आहेत. पण सचिन धुमाळ यांनी बासरी आणि पखवाज वादनाचे प्रशिक्षण देऊन आपल्या ग्रामीण भागात असंख्य कलाकार घडवलेत. मुंबईतील नामवंत संगीत कलाकार येऊन आपल्या ग्रामीण भागात सादरीकरण करतात, हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

पंडित पाटील, माजी आमदार
Exit mobile version