आक्षी येथील मराठीतील पहिल्या शिलालेखाचे जतन; पालकमंत्र्यांच्या हस्ते सुशोभिकरण कामाचे उद्घाटन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मराठी भाषेतील आद्य शिलालेख असलेल्या आक्षी शिलालेखाचे जतन रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले असून, या कामाचे उद्घाटन सोमवारी राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना तसेच जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला होता.

मराठी भाषेतील आद्य शिलालेख व आणखी एक शिलालेख असे दोन शिलालेख आक्षी गावात रस्त्याच्या कडेला दुर्लक्षित अवस्थेत उभे होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शिलालेखाची पाहणी करीत शिलालेख जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. राज्य सरकारने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत शिलालेख जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता.

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत प्राप्त निधीतून आक्षी शिलालेखाचे येथील समुद्रकिनारी असलेल्या साई मंदिर परिसरात सुयोग्य जागेत प्रस्तापित करणे व परिसर सुशोभिकरण करण्यात आले आहे. या कामांचे उद्घाटन सोमवारी उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिलालेखाचे जतन करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल सर्व उपस्थितांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे कौतुक केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता के.बाय. बारदेसकर, आक्षी सरपंच नंदकुमार वाळंज, माजी जिल्हा परिषद सदस्य कबन नाईक उपस्थित होते.

Exit mobile version