गौरवशाली इतिहास जपण्यासाठी दुर्मिळ नाणी जपा – राज्यपाल

| मुंबई | प्रतिनिधी |

भारताचा इतिहास अतिशय जाज्वल्य आणि वैभवशाली आहे. प्रत्येक कालखंडात आपण परकीय आक्रमकांना धैर्याने लढा दिला आहे. इतिहासाच्या विविध कालखंडांमध्ये वापरली गेलेली नाणी ही त्या इतिहासाचा पुरावा आहे. त्यामुळे देशाचा गौरवशाली इतिहास जपण्यासाठी ही दुर्मिळ नाणी जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

नाणेशास्त्र विषयातील तज्ज्ञ व लेखक डॉ. दिलीप राजगोर लिखित मरिपब्लिक कॉईन्स ऑफ इंडियाफ (भारतीय गणराज्यातील नाणी) या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी राजभवन मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील व नाणे संग्राहक दिनेशभाई मोदी, हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष व नाणे संग्राहक पॉल अब्राहम तसेच नाणेशास्त्र विषयातील अभ्यासक उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले की, जो इतिहास विसरतो त्याला भविष्य देखील विसरते. जुनी नाणी इतिहासातील महत्वपूर्ण नोंदी असल्याचे त्यांनी सांगितले. लेखक डॉ. दिलीप राजगोर यांनी नाण्यांच्या विश्‍वात मोठे संशोधन करुन भारत गणराज्य निर्मितीनंतरच्या नाण्यांची अभ्यासपूर्ण माहिती पुढे आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. गणराज्याची नाणी हे पुस्तक युवकांकरिता प्रेरणास्रोत व अभ्यासकांकरिता मैलाचा दगड सिद्ध होईल असेही राज्यपालांनी सांगितले.

विविध टांकसाळींमध्ये घडवल्या गेलेल्या नाण्यांनी देशाची एकात्मता बळकट केली गेली, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ दिनेशभाई मोदी यांनी केले. नाण्यांमध्ये वापरली गेलेली चिन्हे व डिझाइन्स देशातील विविध धर्मांचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे ही नाणी देशातील विविध धर्म, पंथांच्या लोकांना जोडण्यास सहाय्यक ठरली आहेत असे त्यांनी सांगितले.

हे केवळ नाणेशास्त्रज्ज्ञ नसून त्यांनी ब्राह्मी, प्राकृत व उर्दू भाषेचे देखील अध्ययन केल्यामुळे त्यांचे पुस्तक संग्रहणीय असल्याचे डॉ. दिलीप राजगोर यांनी सांगितले. यावेळी राजगोर यांनी राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराई ही नाणी भेट दिली.

Exit mobile version