आमदार अपात्रता प्रकरणी दबाव; नार्वेकरांचा आरोप

| मुंबई | वृत्तसंस्था |
शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय देण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सातत्याने केला जात आहे. ठाकरे गटाकडून होत असलेल्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच मी नियमातच काम करणार असे देखील नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे.

अनेक माध्यमातून अनेक लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी अपात्रतेसंदर्भातील निर्णय ‘महाराष्ट्र मेंबर्स ऑफ असेंब्ली डिसक्वॉलिफीकेशन ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन ॲक्ट 1986’मध्ये दिलेले सर्व नियम आणि संविधानात दिलेल्या तरतुदींच्या आधारे निर्णय घेणार. मला कोणी कितीही प्रभावित करण्याचा प्रयत्न केला किंवा आरोप केले तरी मी त्यातून कुठल्याही प्रकारे प्रभावित होणार नाही. नियमानुसारच काम करणार असेही राहुल नार्वेकर म्हणाले.

माझा परदेश दौरा 26 तारखेलाच रद्द केला होता. मी सीपीएला कळवलं होतं की इकडे काही पुर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी परिषदेसाठी उपस्थित राहू शकणार नाही. पण 28 तारखेला त्या दौऱ्याविषयी चर्चा करून आपण तो दौरा रद्द करायला लावल्याचं चित्र निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. त्यांचा अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. पण अध्यक्ष अशा धमक्यांना घाबरत नाहीत. तुमच्या या कृतीने प्रभावित होणार नाहीत, असेही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

Exit mobile version