नबाब मलिक प्रकरण हा भाजपच्या ढोंगीपणाचा अस्सल नमुना आहे. आपण एकदम आदर्श नीतीमत्ता पाळणारा पक्ष आहोत असे दाखवणे भाजपच्या नेत्यांना फार आवडते. ते वास्तव नाही हे त्यांना ठाऊक आहे. जनतेला तर ते पुरते कळून चुकलेले आहे. तरीही भाजपला या नीतीमानपणाचे सोईस्कर झटके येत असतात आणि जनतेला यातली लबाडी जणू कळत नाही असे यांना वाटते. दूध पिणाऱ्या मांजरासारखा हा सर्व प्रकार आहे. नबाब मलिक यांच्यावर दाऊद टोळीशी संबंध असल्याचे आरोप झाले आहेत व म्हणून आम्ही त्यांच्यासोबत बसू शकत नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सत्ता येते, जाते, पण देश महत्वाचा असे एक थोर वचनही देवेंद्रांनी दादांना ऐकवले आहे. या वाक्याइतके दांभिक आणि विनोदी वाक्य दुसरे कुठले नसावे. ज्या अजितदादांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप भाजप नेत्यांनी केले आणि त्यासाठी बैलगाडीभरून पुरावे देण्याचे नाटक केले त्याच अजितदादांसोबत याच थोर नीतीमान देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा चोरून शपथविधी केला होता. त्याहून कहर म्हणजे यांचे नेते नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा अत्यंत भ्रष्ट असल्याचा आरोप केल्याला 48 तासदेखील झाले नव्हते तेव्हा अजितदादांना दुसऱ्यांदा पावन करून घेतले गेले होते. इतकेच नव्हे तर ते आणि इतर आठ जण झटपट शपथ घेऊन देवेंद्रांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले होते. त्यापूर्वी प्रताप सरनाईक, मुंबईतले नगरसेवक यशवंत जाधव, भावना गवळी किंवा नंतर हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या आरोप करीत होते. मात्र हे नेते शिंदे गट वा दादा गट यांच्यामार्फत सत्तेत सामील झाल्यावर हे आरोप गायब झाले. खुद्द अजितदादांवरचे महाराष्ट्र बँक प्रकरणातले किटाळही नाहीसे झाले वा मागे पडले. राज्यातच नव्हे तर पूर्ण देशभर ही लबाडी चालू आहे व म्हणूनच भाजपला वॉशिंग मशीन असे नाव पडले आहे.
मलिकांवरचे आरोप
नबाब मलिक यांच्यावरच्या आरोपांचा सर्वच प्रकार संशयास्पद आहे. कुर्ल्यातील एक गुदाम व जमीन घेण्याचा हा विषय होता. हा व्यवहार घडला होता वीस वर्षांपूर्वी. पण त्याबाबत आरोप दाखल झाला 2021-22 मध्ये. देवेंद्र फडणवीस 2014 ते 19 या पाच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री व गृहमंत्री होते. तेव्हा त्यांना मलिक यांचे गुन्हे दिसले नव्हते. मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून मलिक यांनी देवेंद्रांवर कठोर टीका सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे केंद्र सरकारची नजर वळली. त्यातही शाहरूख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात फसवण्याचे समीर वानखेडे या अधिकाऱ्याचे कारस्थान मलिक यांनी मोठ्या हिरिरीने उघड पाडल्याने अमित शाह यांचा तिळपापड झाला. त्यातून मग मलिक यांच्याविरुध्द त्या जुन्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले. मलिक यांनी या प्रकरणात दबाव आणला व दाऊदची बहिण हसीना हिला पैसे मिळावेत अशी व्यवस्था केली असाही ठपका त्यात ठेवण्यात आला. मलिक हे मुंबईचे व मुस्लिम असल्याने हा संबंध जोडला तर आरोप अधिक गंभीर होईल असा यामागचा विचार होता की काय हे खटल्याच्या निकालानंतरच कळेल. मात्र असा संबंध जोडला गेल्याने प्रकरणात गंभीर गुन्ह्याची कलमे लावता आली व मलिक यांना जामीन मिळणे कठीण करण्यात आले. यात विशेष असा की, ज्या समीर वानखेडे यांच्याशी भांडण केल्यामुळे हे सर्व घडले त्या वानखेडेंच्या बऱ्याच भानगडी नंतर उघड झाल्या. आता त्यांच्या खात्यानेच हात झटकले असून त्यांच्याविरुध्द खटले दाखल आहेत. दुसरीकडे शाहरूख यांच्या मुलाविरुध्दचे प्रकरण पूर्ण बनावट असल्याचेही न्यायालयात स्पष्ट झाले. हा अमित शाह यांच्या केंद्रीय यंत्रणांना मोठा झटका होता. मात्र मलिक यांच्याविरुध्दची कारवाई चालू ठेवून त्याचा जणू सूड घेतला गेला.
केविलवाणे दादा
मलिक यांच्यावरच्या खटल्याचे काम लवकर पूर्ण व्हावे व आरोप खरे असतील तर कठोर शिक्षा व्हावी, असेच कोणीही म्हणेल. मात्र आतापर्यंत खटल्याची जी प्रगती झाली आहे त्यावरून पोलिसांना त्यांच्याबाबत ठोस पुरावे सादर करता आले आहेत असे वाटत नाही. तरीही तो मुद्दा तूर्तास बाजूला ठेवू. मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजितदादांना अधिकाधिक आमदारांच्या पाठिंब्यांची गरज असतानाच नेमका मलिक यांना जामीन मिळावा हा नक्कीच योगायोग असू शकत नाही. मलिक हे विधानसभेत सत्तारुढ बाजूला बसल्यावर सोशल मिडियातून भाजपच्या भक्तांनी आपल्याच नेत्यांवर जो राग व्यक्त केला त्यानंतर देवेंद्र सावध झाले व त्यांना नीतीमत्तेची उबळ आली, हे स्पष्ट आहे. दुसरे असे की, याबाबत जे काही सांगायचे ते फडणवीस अजितदादांना खासगीत सांगू शकत होते. मात्र त्यांना आपल्या भक्तांसाठी नाटक करणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहिले व त्याची प्रसिध्दी होईल याची व्यवस्था केली. आपण तत्वासाठी कसलीही तडजोड करीत नाही याचा लेखी पुरावाच जणू देवेंद्रांना तयार करायचा असावा. या पत्रानंतर अजितदादा गट एकदम बचावाच्या पवित्र्यात गेला. मलिकांची राजकीय भूमिका काय याबाबत त्यांच्याशी चर्चा झालेली नाही असा खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी केला. जनता मूर्ख आहे असा भाजपप्रमाणेच त्यांचाही समज दिसतो. अजितदादांची स्थिती या युतीत केविलवाणी आहे हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. स्वच्छ व अस्वच्छ कोण हे भाजप ठरवणार हे सत्य त्यांना पचवणे भाग आहे. मध्यंतरी त्यांच्याकडे फाईलचे अंतिम अधिकार नाहीत हे दाखवून दिले गेले. आता दादा गट स्वतंत्रपणे राजकीय भूमिका ठरवू शकत नाही हे स्पष्ट झाले. तीन राज्यांमधल्या विजयानंतर आक्रमक झालेल्या भाजपकडून यापुढे दादांना अधिकाधिक दरडावणी ऐकून घ्यावी लागेल अशी ही लक्षणे आहेत. विकासासाठी सत्तेत गेलो असे कितीही सोंग आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना या ढोंगाचे फटके बसणार आहेत.






