। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात बोटोलिझम (हळव्या) या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मागील 2 महिन्यात सुधागड तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील दिघेवाडी व अन्य गावातील 30 ते 35 जनावरे या आजाराने दगावल्याची शक्यता आहे. दुभती व कामाची जनावरे मेल्याने शेतकरी व पशु पालकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
उन्हाळ्यात जनावरांना चरण्यासाठी चारा नसतो म्हणून जनावरे मेलेल्या गुरांची हाडे चघळल्याने हा रोग होतो. या रोगाचे प्रमाण मोकाट गुरांमध्ये जास्त दिसते. हा रोग संसर्गजन्य असून लागण झालेले एक गुर दुसर्या गावात जाऊन दुसर्या गुरांना देखील संक्रमित करू शकतो. या रोगामुळे अनेकांच्या दुभत्या गायी, म्हशी, बैल आदी मुकी जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. या रोगावर अद्याप शासनाने लस उपलब्ध केली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. लवकरच या रोगावर शासनाने लस उपलब्ध करावी अशी मागणी पशुपालकांमधुन होत आहे.
दिघेवाडी गावातील मागील दोन महिन्यात 30 पेक्षा जास्त गुरे या रोगाने दगावली आहेत. यामधे माझ्या दोन दुभत्या गायी व बैलाचा मृत्यू झाला आहे. शासनाने यावर ठोस उपाययोजना करावी व नुकसान भरपाई द्यावी.
-श्रीपत उतेकर
पशुपालक, दिघेवाडी,
बोटोलिझम रोगाने या गुरांचा मृत्यू झाला असू शकतो. पशुपालकांनी गुरे मृत झाल्या संदर्भात कल्पना दिली नव्हती. मात्र तत्काळ बाधित गुरांवर उपचार करून लसीकरण करण्यात येईल. या रोगावर अद्याप लस उपलब्ध नसली तरी या रोगावर वेळेवर उपचार केले तर हा रोग बरा होतो. त्यामुळे या रोगाची लक्षणे आढळल्यास पशुधन विभागाशी पशूपालकांनी संपर्क साधावा. पशुधन विभाग तात्काळ यावर उपाययोजना करेल. तसेच पशुधन मोकाट सोडू नये
-डॉ. प्रशांत कोकरे,
पशुधन विकास अधिकारी, सुधागड
ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष
दर सहा महिन्यांनी गुरांना लसीकरण करण्यात यावे याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र पाठवण्यात येत असते. त्या पत्राची दखल घेऊन ग्रामपंचायतीने गावातील गुरांना लसीकरण करावे या करिता जनजागृती करावयाची असते. मात्र याकडे ग्रामपंचायती देखील दुर्लक्ष करतांना दिसत आहेत. परिणामी गावातील गुरांना रोग प्रतिबंधक लस टोचली जात नाही. आणि याचमुळे गुरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.
कर्मचार्यांची कमतरता
सुधागड तालुक्याच्या लोकसंख्येनुसार पशुसंवर्धन विभागाकडे कर्मचार्यांची कमतरता आहे. यामुळे प्रत्येक ठिकाणी हे कर्मचारी पोहचण्यास असमर्थ ठरत आहेत. तरीही तालुक्यात असणारे दोन ते तीन अधिकारी व काही कर्मचारी हे गावोगावी जाऊन गुरांना लसीकरण करत असतात.







