अगोटीमुळे मागणीत वाढ,आवक कमी
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
कोकणात सुक्या व ओल्या मासळीची वेगळीच क्रेज आहे, सुकी मासळी साठवन करण्यासाठी महिला अधिक आग्रही असतात.त्यातही पावसाळा जवळ आला असल्याने जिल्ह्यात अगोटीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे सुक्या मासळीची मागणी वाढली आहे. परिणामी मागणी अधिक व आवक कमी असल्याने मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सुक्या मासळीचे भाव वधारले आहेत.मागील महिन्यात चारशे रुपये किलोने मिळणारे सुके बोंबील आता आता सहाशे ते सातशे रुपये किलो झाले आहेत. सोडे, माकूल अशा सुक्या मासळीचे भाव तर खूप वाढले आहेत.
1 जून पासून पुढील महिना दोन महिने पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने मांसाहारी खाणार्यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय व आधार असतो. मात्र सध्या मासळीचा पडलेला दुष्काळ, कमी प्रमाणात मासे मिळणे व मासळीची आवक कमी यामुळे सुक्या मासळीचे भाव वधारले आहेत. अगोटीमुळे सध्या जिल्ह्यातील आठवडा बाजार व मासळी बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी रेलचेल सुरु आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात भाजीपाला व मासळी यांची आवक कमी होते. त्यांचे भाव देखील वधारतात अशा वेळी घरात साठवुन ठेवलेली सुकी मासळी काढली जाते. जिल्ह्यातील समुद्रात अगदी कमी प्रमाणात मासळी सापडत आहे. जी काही सापडलेली मासळी ताजी विकण्यावर मच्छिमारांचा कल असतो. मासळी आधीच कमी मग सुकविण्यासाठी कशी उरणार त्यामुळे मासळी फार कमी जण सुकवित आहेत.
पावसाळ्यात खाण्यासाठी सुकी मासळी साठवूण ठेवतो. त्यामुळे दर वर्षी या दिवसांत सुकी मासळी खरेदी करते. पण आता एवढी महाग झालेली मच्छी खायची कशी. हा प्रश्न पडला आहे. पण घरच्या सर्व मंडळींना जेवणात मासे, मटण नसले तर सुकी मासळी आवर्जून लागते. त्यामूळे किंमत वाढलेली असली तरी सुकी मासळी काही प्रमाणात खरेदी केली आहे. -मिलिंद गायकवाड़, सुकी मासळी खवय्ये
मागील महिन्याच्या तुलनेत आत्ता सुक्या मासळीचे भाव खुप वाढले आहेत. अगोटी असल्याने खवय्ये अधिक प्रमाणत सुकी मासळी खरेदी करतात. मात्र भाव खुपच वाढल्याने ठराविक सुकी मासळी कमी प्रमाणात विकण्यासाठी ठेवतो. -सरफराज पानसरे, सुकी मासळी विक्रेते, पाली
सुकी मासळी भाव प्रतिकिलो
1) साधे सोडे – आत्ता – 1600 रुपये, मागील महिन्यात – 1200 रुपये
2) उच्च दर्जाचे सोडे – आत्ता – 2000 ते 2200 रुपये, मागील महिन्यात – 1800 रुपये
3) बांगडा – आत्ता – 10 ते 15 रुपयांना फक्त एक नग
मागील महिन्यात – 20 रुपयांना 3 किंवा 4 नग
4) अंबाडी – आत्ता – 500 रुपये, मागील महिन्यात – 400 रुपये
5) सुकट – आत्ता – 250 रुपये, मागील महिन्यात – 200 रुपये
6) बोंबील – आत्ता – 600 ते 700 रुपये, मागील महिन्यात – 400 रुपये
7) माकुल – आत्ता – 600 रुपये, मागील महिन्यात – 500 रुपये
8) वाकटी – आत्ता – 400 रुपये, मागील महिन्यात – 300 रुपये
9) मांदेली – आत्ता – 250 रुपये, मागील महिन्यात – 200 रुपये
10) मासे सुकट (खारे) – आत्ता – 400 रुपये, मागील महिन्यात – 300 रुपये
11 ) रेपटी – आत्ता – 250 रुपये, मागील महिन्यात – 200 रुपये
फोटो ओळ, ओळ, पाली, सुकी मासळी. (छाया: धम्मशील सावंत,पाली बेणसे)