अवकाळी पाऊस, कडक उन्हाचा उत्पादनाला फटका
| पनवेल | वार्ताहर |
यंदा अवकाळी पाऊस आणि कडक उन्हाने डाळींच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात डाळींची आवक कमी होत असून, दरात वाढ होत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातून दाखल होणाऱ्या डाळींच्या उत्पादनाला पावसाचा फटका बसला आहे. परिणामी, किरकोळ बाजारात डाळींचे दर 30 ते 35 टक्के, तर कडधान्यांचे दर 20 ते 22 टक्के कडाडले आहेत. तूरडाळ 150 रुपये किलो तर काबुली चणे 150 रुपये किलोपेक्षा अधिक दराने विक्री होत आहे.
श्रावण महिन्यापासून सणांची सुरुवात होते. सणासुदीच्या काळात डाळींना अधिक मागणी असते. तसेच भाजीपाला महाग होत असल्याने गृहिणी डाळींकडे मोर्चा वळवितात. विशेषतः चवळी, हरभरा, तूर, मूग, उडीद डाळीला अधिक पसंती दिली जाते. सध्या एपीएमसी घाऊक बाजारात कडधान्य आणि डाळींची आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात डाळी 30 ते 35 टक्के, तर कडधान्ये 20 ते 22 टक्के कडाडले आहेत. डाळी चढ्या दराने विक्री होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होतात. मात्र, पावसामुळे उत्पादनाला फटका बसला असून, बाजारात डाळींची आवक घटली आहे. किरकोळ बाजारात प्रतिकिलो तूरडाळ आधी 115-120 रुपयांवरून आता 150 रुपये, तर मुगडाळ 90 रुपयांनी उपलब्ध होती ती आता 100 रुपयांवर पोहचली आहे. चणाडाळ 55- 60 रुपये होती ती आता 80-85 रुपयांनी विक्री होत आहे, तर कडधान्यमध्ये काबुली चणे 100-120 रुपयांनी उपलब्ध ते आता 150-160 रुपये आहेत.