पेट्रोल-डिझेलपेक्षा महाग शेवग्याचा तुटवडा
। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील मुख्य बाजारपेठत भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने येथील व्यावसायिकांसह सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून गेले आहे. अवकाळी पाऊस आणि इंधन दरवाढ या मागील कारण सांगण्यात येत असून, आता पेट्रोल-डिझेल या इंधनापेक्षाही जास्त भावात असणार्या शेवग्याच्या शेंगांनी चांगलाच भाव खाला आहे. श्रीवर्धनमध्ये पर्यटन व्यवसायासोबतच कौटुंबिक बजेट भाजीपाला दरावर अवलंबून आहे. मात्र, नियमित खाद्यामध्ये वापरात येणार्या बटाटा, वांगे, कांदे, हिरवी मिरची, काकडी, टोमॅटो या भाज्यांच्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वेळेला बाजारात शेवग्याच्या शेंगांचा तुटवडा होत असल्याने ‘आता महाग तर महाग पण भाजीपाला तर आणाल का?’ असा त्रासिक सवाल गृहिणींमधून पुढे येत आहे.
शेतकरी बांधवाना देखील यंदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यात इंधन दरवाढ केल्यामुळे त्यांनादेखील महागाईचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजीला व्यापारीवर्ग कमी दरात घेतो. असे काही चित्र स्पष्ट होत असले तरी यंदा भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असल्याने अनेक भाज्यांचे भाव वधारले आहेत.
आमच्या दुकानात होलसेल व किरकोळसाठी नेहमीच शहरातील अनेक मंडईतून भाजी खरेदी करत असतो. मात्र, यंदा मार्केटमध्ये येणारी भाजीची आवक घटल्याने भाव वाढीस कारण ठरत आहे. आणखी अनेक भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे.- प्रवीण पाटूकळे, बोर्लीपंचतन
घाऊक व किरकोळ भाजी विक्रेते
भाजीचे प्रकार – होलसेल – किरकोळ
शेवगा – 160 – 220
बटाटा – 18 – 25
वांगे – 60 – 80
कांदे – 35 – 40
हिरवी मिरची – 100 – 120
काकडी – 40 – 60
टोमॅटो – 40 – 60
कार्ले – 60 – 80







