पनवेल पालिकेचा स्वच्छतेसाठी गौरव

देशात 27 वा तर राज्यात 2 रा क्रमांक
। अलिबाग । वार्ताहर ।
स्वच्छ सर्वेक्षणाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार मिळाले असून रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेने आणि कर्जत व खोपोली नगरपरिषदांनी विविध गटातील राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका महानवर, नगरसेवक गणेश कडू, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव विधाते यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पनवेल महापालिकेला 1 ते 10 लोकसंख्येच्या शहरांमध्ये देशांमध्ये 27 वा क्रमांक मिळाला असून राज्यामध्ये 2 रा क्रमांक मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये सहभागी होत यावर्षी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आल्या. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण-संवर्धनाचे संदेश प्रसारित करणार्‍या आकर्षक रंगचित्रांनी सजलेली भिंतीचित्रे, शहरातील शौचालये शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर, सायकल रॅली, विविध टाकाऊ वस्तूंसाठी रिड्युस, रि-यूज, रि-सायकल या संकल्पनांवर आधारित स्वच्छता रथ महापालिकेने बनविले आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधी ,अधिकारी, कर्मचारीवृंदाने व स्वच्छता मित्रांनी केलेले स्वच्छताविषयक काम आणि त्याला नागरिकांचा लाभलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पनवेल महानगरपालिकेस स्वच्छतेचा हा बहुमान प्राप्त झाला आहे.

Exit mobile version