प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

डॉक्टरांना तत्काळ स्थलांतराचे आदेश

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

संगमेश्‍वर तालुक्यातील फुणगूस प्राथमिक आरोग्यकेंद्राची इमारत धोकादायक बनली आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी या इमारतीची पाहणी केल्यानंतर तेथील डॉक्टरांना तत्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फुणगूस येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. परंतु, ते कामही गेले काही महिने रखडले असून अत्यंत संथगतीने ते काम सुरू होते. या आरोग्यकेंद्राचे कामकाज कर्मचारी निवासस्थान तसेच तात्पुरत्या शेडमधून सुरू ठेवण्यात आले. मात्र, या ठिकाणी रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरोग्यकेंद्रातील डॉक्टर राहत असलेली इमारतही अतिधोकादायक बनली असून ती कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती आहे. या संदर्भात फुणगूस येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष लांजेकर यांनी सतत पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.

पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली व डॉक्टर निवासस्थान धोकादायक असून ते वापरणे योग्य नाही, असे निदर्शनास येताच त्यांनी या धोकादायक इमारतीचा वापर तत्काळ थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, तिथे राहणार्‍या डॉक्टरांना स्थलांतरित होण्याचे लेखी आदेशही देण्यात आलेले आहेत. परंतु, या डॉक्टांराची पर्यायी निवास व्यवस्था केली नसल्यामुळे जुनी इमारत सोडली तर कोठे जायचे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

वेळेत काम पूर्ण होणे अपेक्षित
फुणगूस आरोग्यकेंद्राच्या नवीन इमारतीचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर वैद्यकीय अधिकार्‍यांचा निवासव्यवस्थेचा प्रश्‍नच उद्भवला नसता. कामात झालेली दिरंगाई सध्या उद्भवलेल्या समस्येला कारणीभूत आहे. यामुळे आता डॉक्टरांची व्यवस्था कुठे करायची, हा प्रश्‍न आहे. याकडे तरी प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल, असे लांजेकर यांनी सांगितले.
Exit mobile version