भारतीय हॉकी संघाचे पंतप्रधानांकडून कौतुक

मन की बातमधून पुरुष, महिला संघाला शुभेच्छा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या 80 व्या भागाची सुरुवातच महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या आठवणीने केली. तसेच त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाच्या कामगिरीचाही उल्लेख करुन अप्रतिम खेळाबद्दल कौतुक केले.
ते म्हणाले, महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून आजचा दिवस साजरा करतो. तसंच ऑलिम्पिकबद्दल बोलताना मोदी म्हणाले, तब्बल चार दशकांनंतर, म्हणजेच 41 वर्षांनंतर भारताच्या मुला-मुलींनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा जीव ओतला. सर्वात आधी हॉकीमध्ये भारताचं नाव ध्यानचंद यांनी केलं होतं. त्यामुळे यंदाच्या कामगिरीनंतर ध्यानचंद यांची आत्मा जिथेही असेल, तिथे प्रसन्न झाली असेल.
नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला नमवत भारताने कांस्यपदक पटकावलं. तर, ग्रेट ब्रिटनकडून 4-3 ने पराभव मिळाल्यामुळे भारतीय महिलांचे पदक मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिले. पण, त्यांनी केलेल्या अप्रतिम खेळाने सर्वांचीच मनं जिंकल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.

Exit mobile version