संशोधन केंद्रात दहा हजार रोपे विक्रीस; दोन चक्रीवादळात बागायतदारांचे मोठे नुकसान
| श्रीवर्धन | समीर रिसबूड |
श्रीवर्धन तालुक्यातील सुपारी बागायतदारांचे निसर्ग चक्रीवादळात मोठे नुकसान झाले होते. वादळात तालुक्यातील 70 टक्के पोफळींचे नुकसान झाले, तर उर्वरित पोफळींवर रोगराई, किडींचा प्रादुर्भाव झाल्याने श्रीवर्धन रोठा सुपारीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. या कारणास्तव श्रीवर्धन रोठा सुपारी नामषेश होण्याची भिती निर्माण झाली होती. परंतु, गेल्या चार वर्षांपासून बागायतदारांनी रोठा लागवडीस प्राधान्य दिले असून गेल्या चार वर्षांत श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र व नर्सरी मधून पंचेचाळीस हजार रोपांची खरेदी तालुक्यातील बागायतदारांना देण्यात आली आहेत.
रोठा सुपारीमध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त असून खाण्यास मऊ व फळाचा आकार आकर्षक असल्याने बाजारात चांगला भाव मिळतो. रोठ्याचे वार्षिक उत्पादन 626.17 मेट्रिक टन इतके होते. एका हेक्टर क्षेत्रात 2.25 मेट्रिक टन उत्पादकता असल्याने नैसर्गिक आपत्ती येण्याआधी तालुक्यातील बागायतदारांचे 2015 ते 2020 या वर्षांतील सरासरी उत्पन्न अंदाजे तीन कोटी पंचाहत्तर लाख इतके होते. मात्र, निसर्ग व तक्ते या दोन चक्रीवादळांनी सुपारी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
वादळामुळे उंच पोफळी भुईसपाट झाल्या. अनेक पोफळींना उभ्या चिरा गेल्या.त्यात पावसाचे पाणी साठल्याने बुरशी धरली. जेमतेम 30 टक्के पोफळींनी तग धरला होता, परंतु तक्ते चक्रीवादळात या पोफळींचे नुकसान झाले. वादळानंतर कीड,कोळ रोग (फळाची गळ), अळंबी (मूळ कुजणे), बांड रोग अशा रोगराईने घेरले. निसर्गाच्या लहरीपणामुळे श्रीवर्धन रोठा सुपारीचे उत्पादनात मोठी घट झाली होती.
काही कालावधीतच सुपारी बागायतदारांनी पुन्हा जोमाने रोठा सुपारी लागवडी केली. श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र व तालुक्यातील खासगी नर्सरीतून सुपारीची रोपे खरेदी करीत वाड्यांमध्ये रोठा लागवडीला प्राधान्य देत आहेत. श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र अधिकारी डॉ. सिद्धेश सावंत यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या हंगामासाठी श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्रात एक ते दीड वर्षाची दहा हजार रोठा सुपारीची रोपे विक्री करीता उपलब्ध असून, त्यापैकी दीड हजार रोपांची विक्री झाली आहे. एका रोपाची किंमत चाळीस रुपये इतकी आहे.
लागवडीस पोषक वातावरण
तालुक्यात 365.25 हेक्टर क्षेत्रात रोठा सुपारीची लागवड होती. सुपारीला समुद्रकिनाऱ्यावरील गाळाची,पाण्याचा निचरा होणारी, तसेच बारमाही ओलावा असणारी जमीन मानवते. त्याचप्रमाणे 20 ते 35 सेल्सिअस तापमान योग्य आहे.






