| पनवेल | वार्ताहर |
तळोजा कारागृहाच्या सुरक्षेतून बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास 28 वर्षीय बंदी पळून गेल्याची घटना घडली आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस 28 वर्षीय बंदी मुजाहीद गुलजार खान याचा शोध घेत आहेत. परंतु अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे सुरक्षिततेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुजाहिद याच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. गुरुवारी रात्री याबाबत तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी एकनाथ पाटील यांनी खारघर पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये मोलमजुरी करणारा मुजाहिद हा शिरुर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याची रवानगी तळोजा कारागृहात केली होती. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कारागृहातील पोलिसांच्या ताब्यात असताना कारागृहासमोरील रस्त्यावरुन तो पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत कारागृह प्रशासन अधिक चौकशी करीत आहे. परंतु अशा घटना वेगवेगळ्या कारागृहात वारंवार घडत असल्याने सुरक्षिततेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.