महात्मा गांधी उद्यानाची प्रितम म्हात्रे यांनी केली पाहणी

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेच्या समोरच असलेले महात्मा गांधी उद्यानातील सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेतेप्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका सारिका भगत यांनी उद्यानाला भेट दिली. उद्यानात गेल्यानंतर प्रितम म्हात्रे यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करताना पुतळ्या भोवती जमलेले जाळे त्यांच्या निदर्शनास आले असता त्यांना राग अनावर झाला त्यांनी लगेचच संबंधित अधिकार्‍यांना यासंदर्भात जाब विचारला. त्यानंतर पुढे सदर उद्यानात टेंडर मधील कामानुसार आवश्यक असलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे हे त्यांनी अधिकार्‍यांना निदर्शनास आणून दिले. उद्यानामध्ये सुरक्षारक्षक असतानासुद्धा सर्व परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला निदर्शनास आला याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आणि याचा अर्थ तेथील सुरक्षा रक्षकांच्या कामांवरती पुन्हा एकदा त्यांनी प्रश्‍नचिन्ह उभे केले. दरम्यान सदर उद्याना संदर्भात राहिलेल्या त्रुटी आणि आवश्यक ती कामे त्वरित पूर्ण करून सदर उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्धार यावेळी विरोधी पक्षनेतेप्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version