प्रीतम म्हात्रे इतिहास घडविणार

। पनवेल । प्रतिनिधी ।

स्वातंत्र्यानंतर उरण विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता आणि यापुढेही तो राखण्यासाठी नव्या उमेदीने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. येत्या निवडणूकीत उरण विधानसभा मतदारसंघातून शेकापचे युवा नेते प्रीतम जनार्दन म्हात्रे हे निवडूकीला सामोरे जात आहेत. यामुळे उरण विधानसभा निवडणुकीत येथील तरुणांना प्रीतम म्हात्रेंच्या रूपाने नवा आमदार हवा असल्याचे मत व्यक्त करीत आहेत.

उरण विधानसभेचे नेतृत्व शेकापचे जेष्ठ नेते माजी खासदार लोकनेते दि.बा. पाटील, माजी विरोधी पक्षनेते दत्ता पाटील, माजी आमदार दत्तूशेठ पाटील, माजी मंत्री मिनाक्षी पाटील, माजी आमदार विवेक पाटील यांनी केले आहे. यामुळे उरण हा शेतकरी कामगार व सर्वसामान्य जनतेसाठी लढणार्‍या वीरांचा मतदारसंघ आहे. तसेच, 1981 च्या सिडको विरोधी आंदोलनात लोकनेते दि.बा. पाटील यांच्या साथीने जासई नाक्यावर आपले रक्त सांडणारे व 1984 च्या ऐतिहासिक उरण शेतकरी आंदोलनाचे शेकापचे जेष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांच्या संघर्षाचा वारसा आहे. यामुळे येत्या निवडणूकीसाठी शेतकरी कामगार पक्ष हा नव्या उमेदीने उतरला आहे. यासाठी उरण मतदारसंघात गावोगावी बैठका सुरू असून आतापर्यंत अनेक कारणांमुळे शेतकरी कामगार पक्ष सोडून गेलेले कार्यकर्ते पुन्हा एकदा शेकापक्षाच्या विचारांकडे वळू लागले आहेत.

यावेळी उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष हा आरपारची लढाई लढण्यासाठी सज्ज झाला आहे. सर्व स्तरातील मतदार शेकापच्या मागे ठामपणे उभे राहण्यासाठी येथील कार्यकर्त्यांनी दिवसरात्र काम करून आपल्या पक्षाचे जुने दिवस परतून आणण्याचा निर्धार केला आहे. ‘आता एकच लक्ष, नव्या युगाचा शेकापक्ष’ असाही नारा यावेळी देण्यात आला.

विनोद साबळे यांचा पाठिंबा
करंजाडे येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी उरण विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. विनोद साबळे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रीतम म्हात्रे हे उरणचे आमदार व्हावे ही काळाची गरज आहे. ते तरुण उमेदवार असल्याने आणि उरणचा विकास व्हावा यासाठी नागरिकांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन देखील विनोद साबळे यांनी केले आहे.
Exit mobile version