। मुंबई । प्रतिनिधी ।
आयपीएलच्या 17 व्या हंगामात शनिवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबईने दिल्लीचा 29 धावांनी पराभव केला. मुंबईच्या विजयामध्ये जसप्रीत बुमराहची भूमिकाही मोठी होती. बुमराहने भेदक मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना बांधून ठेवले. बुमराहने धोकादायक ठरु पाहणार्या पृथ्वीचा त्रिफाळा उडवला. जसप्रीत बुमराहच्या भेदक यॉर्करपुढे पृथ्वी शॉ धाराशियी पडला. बुमराहने अतिवेगाने टाकलेला चेंडू कळायच्या आतच पृथ्वीचा त्रिफाळा उडाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
जसप्रीत बुमराहने 12 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पृथ्वी शॉ याचा त्रिफाळा उडवला. जसप्रीत बुमराहने टाकलेला यॉर्कर अचूक आणि वेगवान होता. चेंडू समजण्याआधीच पृथ्वीच्या दांड्या गुल झाल्या होत्या. बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ओली पोपला अशाच धारदार यॉर्करवर बाद केले होते. आता बुमराहने आयपीएलमध्ये फेकलेल्या या चेंडूचे खूप कौतुक होत आहे. त्याचा व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहे. नेटकर्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.