| महाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील चांढवे गावच्या हद्दीमध्ये टोल नाक्या नजीक खाजगी बस पलटी झाल्याची घटना घडलेली आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून महाड पोलादपूरच्या मध्यभागी असलेल्या चांढवे गावच्या हद्दीमध्ये पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी ते मुंबई जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसला अपघात झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर टोलनाक्याजवळ ही बस आली असता बसचा टायर फुटल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. पोलीस प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. रत्नागिरी ते मुंबई जाणाऱ्या या बसमध्ये 22 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातामध्ये 7 प्रवासी जखमी झाले असून 4 प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. या अपघाताबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे