आंबा घाटात खाजगी बस दरीत कोसळली

। कोल्हापूर । प्रतिनिधी ।

कोल्हापूर–रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात घडला आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला असून यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरीच्या दिशेने जात असताना ही खाजगी बस दरीत कोसळली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर–रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात परराज्यातून आलेली एक बस 70 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून बसमध्ये सुमारे 100 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आंबा घाटातील चक्री वळणाजवळ ही दुर्घटना घडली. बसचालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली. मात्र दरीत खाली जात असताना बस एका मोठ्या झाडावर आदळल्याने ती पूर्ण खोल दरीत जाण्यापासून थांबली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटना रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या हद्दीत घडली असून पोलीस पथक, स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. संबंधित बस मध्यप्रदेशातील भिंड येथील असल्याचे समोर आले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version