| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशनच्यावतीने ‘रायगड फोटो सुंदरी 2025′ ही फॅशन शो स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रिया पाटील हिने ‘रायगड फोटो सुंदरी’चा किताब मिळविला. प्रिया पाटील हिने हा किताब मिळविल्याने अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
फोटो एक्स्पोमध्ये छायाचित्रकारांना मॉडेल फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी संदर्भात ज्ञान अवगत व्हावे, फॅशन फोटोग्राफीचा अनुभव मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. रायगड जिल्ह्यातील 26 स्पर्धक प्राथमिक फेरीत सहभागी झाले होते. यापैकी 14 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी स्पर्धेचे कोरिओग्राफर गौरव पाटील यांनी निवड केली. यावेळी वेस्टर्न वेशभूषा परिधान करून रॅम्पवॉक करणाऱ्या स्पर्धकांमधून अलिबाग येथील प्रिया पाटील हिने ‘रायगड फोटो सुंदरी 2025′ चा किताब पटकावला. तर, सिद्धी वाकडे हिने द्वितीय व पुजा बांधकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजयी स्पर्धकांना पेण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी या स्पर्धेचे परीक्षण मुंबई येथील प्रसिद्ध छायाचित्रकार तृप्ती नाईक आणि ठाणे येथिल फॅशन छायाचित्रकार राजेंद्र तुपे यांनी केले. यावेळी फोटोग्राफर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक सुभेकर, विद्यमान अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे, सचिव आनंद निंबरे, खजिनदार जितेंद्र मेहता, सहसचिव दीपक बडगुजर, सल्लागार दादा आर्ते, कोअर कमिटी सदस्य अनिरुद्ध जोशी, अविनाश राऊत, सुशिल घाटवळ, निलेश शिर्के, चैतन्य पाटील, संदीप म्हात्रे, सर्व तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि फोटोग्राफर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहा येथील छायाचित्रकार संदीप भगत यांनी केले.







