मुरुडमधील प्रियदर्शनी इमारत जमीनदोस्त

अल्पावधीच जीर्ण झाल्याने चर्चेला उधाण
| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड नगरपरिषदेने प्रियदर्शनी (मिनी मार्केट) इमारत सन 2004 साली बांधून पूर्ण केली होती. तळमजला व पहिला मजला अश्सा पद्धतीने ही इमारत पूर्ण करण्यात आली.तळ मजल्यावर व्यापार्‍यांसाठी गाळे, तर पहिल्या मजल्यावर विविध समाजसेवी संघटनांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. येथे व्यायामशाळासुद्धा होती. त्यावेळी ही इमारत बांधण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून सुमारे 25 लाख रुपये खर्च करून ही प्रियदर्शनी इमारत बांधण्यात आली होती. परंतु, 2004 ला बांधलेल्या या इमारतीला फक्त 18 वर्षांचेच आयुष्य मिळाल्याने सध्या मुरुड शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

या इमारतीचा स्लॅब कोसळून लोखंडी सळ्या उघड-उघड दिसू लागल्याने अपघात होऊ नये यासाठी मुरुड नगरपरिषदेने नगरसेवकांचा ठराव घेऊन ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. या इमारतीमध्ये असणार्‍या गाळेधारकांना रीतसर नोटीस देऊन सदरच्या इमारतीमधील सामान घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली. आजपासून जेसीबीच्या साह्याने सदरची इमारत पाडण्याची सुरुवात करण्यात आली आहे. मुरुड नगरपरिषदेने चांगल्या दर्जाची कामे होण्यासाठी अनुभवी व ज्याच्याकडून कामाची हमी मिळणार आहे, अशाच ठेकेदारांना इमारतीची कामे देण्यात यावी, अशी मागणी मुरुड शहरातील जनतेकडून करण्यात येत आहे. प्रियदर्शनी या इमारतीला फक्त 18 वर्षांचे आयुष्य मिळाल्याने जनतेकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version