। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या लखीमपूर हिंसाचारातील मृत शेतकर्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होत्या. लखीमपूर हिंसाचार प्रकरणानंतर राजकीय वातावरण पेटलं आहे. या प्रकरणी विरोधी पक्षाने भाजपाला लक्ष्य करत अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली असताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांना कलम 151 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. प्रियांका गांधी रविवारी (3 ऑक्टोबर) रात्री उशिरा लखनऊहून लखीमपूर खेरीला रवाना झाल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना सीतापूरमध्ये ताब्यात घेतलं.
डिटेन्शन रूममध्ये केर काढतानाचा प्रियांका गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर प्रियंका या लखीमपूरमधील हिंसाचारादरम्यान मृत पावलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होत्या. यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आलं. सद्यस्थितीत प्रियांका यांनी कोठडीतच सत्याग्रह सुरू केला आहे. मी शेतकर्यांना भेटल्याशिवाय इथून माघारी जाणार नाही, असं निर्धार देखील यावेळी प्रियांका यांनी बोलून दाखवला आहे. दरम्यान, असाही आरोप होतं आहे की, पोलिसांनी प्रियांका गांधींना कायदेशीर मदत पोहोचू दिली नाही.
सोमवारी (4 ऑक्टोबर) सकाळी प्रियांका गांधींना हरगावजवळ पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. यावेळी, प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशच्या पोलिस अधिकार्यांमध्ये मोठा वाद घातला. प्रियांका गांधी पोलिसांना म्हणाल्या की, तुम्ही मला ताब्यात घेऊ शकत नाही. तरीही जर तुम्ही मला वॉरंटशिवाय नेलं आणि धक्काबुक्की केलीत तर हे अपहरण, विनयभंग आणि हिंसाचाराचं प्रकरणात गणलं जाईल.
आजच्या घटनेवरुन दिसून येत आहेत की हे सरकार शेतकर्यांचा आवाज दाबण्यासाठी राजकारण करत आहे. हा शेतकर्यांचा देश आहे भाजपाचा नाही. पिडितांच्या नातेवाईकांना भेटून मी काही गुन्हा करत नाही. ते आम्हाला का अडवत आहेत? त्यांच्याकडे अटक करण्यासाठी वॉरंट तरी हवं ना?, असे प्रश्न देखील प्रियंका यांनी उपस्थित केले आहेत.