। उरण । वार्ताहर ।
प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोलीला सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. या इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील खोल्यांचे, दालनाचे बांधकाम हे कित्येक दिवस निधी अभावी रेंगाळत पडलेले आहे. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांना रात्री अपरात्री थोडीशी विश्रांती ही भंगाराच्या रुममध्ये घेण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेने तात्काळ लक्ष केंद्रित करुन रुग्णालयाच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी तसेच रेंगाळत पडलेल्या इमारतीच्या बांधकामाला गती देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश तांडेल यांनी केली आहे.
तालुक्यातील पावणे दोन लाख जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे हे एकमेव रुग्णालय आहे. परंतु या रुग्णालयाला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभाग सुसज्ज करण्यासाठी आणि इतर काही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी हे दुर्लक्ष करत असल्याने गोरं गरीब जनतेला आजारांवर उपचार करुन घेण्यासाठी आपला पैसा आणि वेळ घालवून खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. सध्या ग्रामीण भागात सर्दी, खोकला, ताप, मलेरिया या आजारांनी रहिवाशी त्रस्त आहेत. परंतु सदर रुग्ण हे सुविधांचा अभाव असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राकडे औषधांचा साठा आहे. परंतु रुग्णालयात पाण्याचा तुटवडा आहे. तसेच डॉक्टर वर्गाना राहण्यासाठी रुम नाही. रुग्णालयातील दुसर्या मजल्यावरील सुशोभीकरणाची कामे रेंगाळत पडलेली आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री डॉक्टरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
डॉ. अर्चना तारंगे
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील बांधकामांकडे लक्ष केंद्रित केले तर रुग्णालयातील डॉक्टरांना राहण्यासाठी रुम उपलब्ध होईल.सध्या व्हायरस ताप आहे.तरी रुग्णांनी घाबरून न जाता गावातील आशा वर्कर्स यांच्या कडून किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन घ्यावे तसेच रुग्णालयात आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी वरिष्ठांकडे पत्र व्यवहार केला आहे.
राजेंद्र इटकर, उरण तालुका वैद्यकीय अधिकारी