खनिज उत्खननप्रकरणी कारवाईचा बडगा; 50 जणांवर कारवाई

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

भूगर्भातून अवैधरित्या उत्खनन करीत खनिजांची अवैध वाहतूक करणार्‍या तब्बल 50 जणांवर खनिकर्म विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी 20 लाख 34 हजार 425 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणी एकही वाहन अथवा यंत्रसामुग्री जप्त केली नाही. फक्त दोन प्रकरणात थेट पोलीस कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षापासून अवैध पध्दतीने उत्खनन होत असल्याने प्रशासन देखील चांगलेच सर्तक झाले आहे. गेल्या आठ महिन्यात खनिकर्म विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी केलेल्या कारवाईनुसार रेती उत्खननाची 33, तर माती उत्खननाची 7 अशा 40 प्रकणात कारवाई करण्यात आली आहे. मुरुम उत्खनन आणि त्याची वाहतुक करण्याचे एकही प्रकरण उघड झालेले नाही. दगडाचे उत्खनन आणि त्याची वाहतूक करणे असे प्रत्येकी एक प्रकरणी कारवाई झाली आहे.

रेती उत्खननाची सहा प्रकरणे आणि त्याची वाहतुक करण्याचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. त्यानुसार एकूण 40 उत्खननाच्या आणि 10 वाहतूक प्रकरणी खनिकर्म विभागाने कारवाई केली आहे. त्यानुसार तब्बल 20 लाख 62 हजार 223 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, तर 20 लाख 34 हजार 425 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ले नाहीत
राज्याच्या विविध ठिकाणी महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी कारवाईसाठी गेले असता त्यांच्यावर रेती माफियांनी अंगावर वाहन घालणे अथवा बंदुकीचा धाक दाखवून गोळीबार करण्याच्या घटना घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातही बंदुकीचा धाक दाखवून हवेत गोळीबार केल्याच्या घटना आधी घडल्या आहेत. परंतू या वर्षात अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर एकही हल्ला झाल्याची नोंद झालेली नाही, ही विशेष बाब म्हणावी लागेल.

प्रशासनाने केलेल्या कारवाईत फक्त दंड वसूल केला आहे; मात्र या प्रकरणात एकही आरोपी अटक केलेला नाही. तसेच वाहने आणि यंत्रसामुग्री जप्त करण्यात आलेली नाही. ही देखील अधोरेखित करणारी बाब आहे.

अवैध उत्खनन आणि त्यांची वाहतूक करणार्‍या 50 जणांवर खनिकर्म विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये 20 लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. यापुढे देखील अशीच कारवाई सुरु राहणार आहे.

रोशन मेश्राम
जिल्हा खनिकर्म अधिकारी, रायगड
Exit mobile version