मासळीच्या कचर्‍यातून मत्स्य खाद्य निर्मिती

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

मासळीच्या कचर्‍यावरील प्रक्रिया प्रकल्प देशातील काही मोठ्या शहरांतील खाजगी संस्थांमध्ये राबविले जात आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकारातून ‘फिश फीड’ हा मासळी बाजारातील कचरा विल्हेवाट करण्याचा हा कार्यान्वित प्रकल्प देशातील पहिलाच प्रकल्प आहे.

विविध प्रकारच्या कचर्‍याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जात असताना मासळी बाजारातील कचरा हा देखील एक वेगळा व महत्वाचा भाग असून मासळी बाजारातील कचर्‍यावर अत्याधुनिक पध्दतीने प्रक्रिया करुन, त्यापासून मत्स्य खाद्य तयार करण्याचा अत्यंत आधुनिक असा ‘फिश फीड’ प्रकल्प दिवाळेगाव येथील मासळी मार्केटमध्ये प्रायोगिक स्वरुपात राबविला जात आहे.

मासळीच्या कचर्‍यावरील प्रक्रिया प्रकल्प देशातील काही मोठ्या शहरांतील खाजगी संस्थांमध्ये राबविले जात आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकारातून ‘फिश फीड’ हा मासळी बाजारातील कचरा विल्हेवाट करण्याचा हा कार्यान्वित प्रकल्प हा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविला जाणारा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आणखी एका नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आरंभ करण्यामध्ये देशात अग्रणी ठरली आहे. फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया या भारत सरकार मान्यताप्राप्त संस्थेचा वतीने एक टन क्षमतेचा हा ‘फिश फीड’ प्रकल्प दिवाळेगाव मासळी मार्केटमध्ये प्रायोगिक स्वरुपात कार्यान्वित करण्यात आला आहे. याविषयीचा सामंजस्य करार महानगरपालिका आणि संस्थेमध्ये झालेला आहे.

200 किलो मासळीच्या कचर्‍याची एक बॅच अशा दिवसभरात 5 बॅचेस ही या प्रकल्पाची क्षमता असून या प्रक्रियेमध्ये मार्केटमध्ये निर्माण होणारा मासळीचा कचरा एकत्रित करुन यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने अत्यंत बारीक केला जाणार आहे. त्यानंतर त्याचे द्राव्य स्वरुपातील मत्स्य खाद्य म्हणून रुपांतर करण्यात येणार आहे. केंद्र सरकार अंगिकृत भारतीय कृषि अनुसंधान परिषद यांच्यामार्फत पुरविण्यात आलेल्या तंत्रज्ञानानुसार फिश फीड हा प्रकल्प फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत दिवाळे गावातील मासळी मार्केटमध्ये प्रायोगिक स्वरुपात राबविण्यास सुरुवात करण्यात आलेली असून, येथील यशस्वी प्रयोगा नंतर टप्प्प्याटप्प्याने इतरही मासळी मार्केटमध्ये ही कार्यप्रणाली राबविण्याचे नियोजन आहे. याठिकाणी 50 किलोच्या ट्रायल बॅच मधून निर्माण झालेले द्राव्य स्वरुपातील मत्स्य खाद्य तपासणीकरीता आयसीएआरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहे.

Exit mobile version