| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यात वावे धरणाच्या पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी आपली आर्थिक प्रगती साधली आहे. धरणाच्या पाण्यावर येथील शेतकरी विविध पिकांचे उत्पादन घेऊन आपला उदरनिर्वाह चालवीत आहेत. बामणघर गौळवाडी येथील शेतकरी संतोष पाडगे यांनी आपल्या शेता शेजारून वावे धरणाच्या वाहत असलेल्या पाण्याचा वापर करून केवळ चार गुंठ्यांमध्ये विविध भाज्यांचे पिक घेऊन मळा फुलविला आहे.
संतोष यांनी चार गुंठा जागेमध्ये कोथिंबीर, टोमॅटो, मका, माठ, दुधी भोपळा, मिरची, वांगी, मेथी यांसारख्या विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेऊन गोंडा फुलाचे देखील पीक घेतले आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीस केवल भाताचे पिक घेत असताना लहरी हवामानामुळे बऱ्याचदा पिकाचे नुकसान होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे उदरनिर्वाह भागविण्यासाठी भात पिकासह इतरही काही जोडधंदा असावा या हेतूने त्यांनी विविध भाज्यांचे उत्पादन घेण्याचे ठरविले. यासाठी त्यांना आपल्या शेताच्या शेजारून वाहणाऱ्या वावे नदीच्या पाण्याचा मोठा उपयोग झाला.आपल्या मेहनतीच्या व कष्टाच्या जोरावर त्यांनी चार गुंठ्यांमध्ये विविध प्रकारच्या भाज्यांचे नाविन्यपूर्ण उत्पादन घेतले आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला व शेजारीच त्यांनी चवळी, मूग, मटकी, हरभरा यांसारख्या कडधान्याची लागवड केली आहे.







