प्रागतिक पक्षांची भाजप विरोधात एकजूट

पुण्यात सत्ता परिवर्तन शिबिराचे आयोजन

| पुणे | प्रतिनिधी |

भाजपच्या विरोधात राज्यातील प्रागतिक पक्षांनी एकजूट केली आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यात प्रागतिक पक्षांच्यावतीने सत्ता परिवर्तन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात बोलताना देश स्वातंत्र्यासाठी मुस्लिम बांधवांनी देखील रक्त सांडवले आहे. सध्याचं राजकारण दिशाहीन असून मुस्लिम बांधवांबद्दल दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. आज भ्रष्टाचारी नेत्यांना सामावून घेत भाजप त्यांना क्लिनचीट देत आहे. त्यामुळे संविधान विकू पाहणाऱ्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा सपाचे आ.अबू आझमी यांनी दिला आहे.


पुण्यातील कँम्प येथे अल्प बचत भवन येथे रविवारी (दि.9) आयोजित केलेल्या प्रागतिक पक्ष, महाराष्ट्रच्या सत्ता परिवर्तन शिबिरात ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन आ. अबू आझमी यांनी केले. तर, भालचंद्र कानगो यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, आ. श्यामसुंदर शिंदे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष भालचंद्र कानगो, डॉ. असिम सरोदे, जनता दलाचे उपाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, माजी आ. पंडीत पाटील, बाळाराम पाटील, शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील तसेच, घटक पक्षाचे पदाधिकारी, नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यापुढे मार्गदर्शन करताना अबू आझमी यांनी सांगितले की, सध्याचे सरकार देशातील सर्वधर्म समभाव ही संस्कृती मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे. मुस्लिम बांधवांचा संबंध पाकिस्तानसोबत जोडून समाजात द्वेष निर्माण केला जात आहे. जनतेच्या डेळ्यात धूळफेक केली जात आहे. वर्षभर भ्रष्टाचारी म्हणून ज्यांच्या मागे ईडी लावली, त्यांच्यासोबतच राहून सरकार चालविणारे हे अनैतिक सरकार आहे. भाजपकडे भ्रष्टाचार साफ करण्याचे मशिन असावे, ज्यामध्ये टाकल्यावर भ्रष्ट नेत्यांना क्लिनचीट मिळते. मात्र सरकारने सुरु केलेल्या असंविधानिक राजकारणाला प्रागतिक पक्षाच्या माध्यमातून कडकडून विरोध आहे. केवळ निवडणूकीसाठी नाही, तर भविष्यात प्रागतिक पक्षातील सर्व घटक पक्ष एकत्र काम करतील, असेही त्यांनी सांगितले.


आघाडीतील घटक पक्ष
शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष, जमता दल (सेक्यूलर), बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहूजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्यूनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन, आरपीआय (सेक्यूलर), श्रमिक मुक्ता दल

Exit mobile version