| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले आहे. अनेक कार्यकर्त्यांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यामध्ये भाईंचा मोलाचा वाटा राहिला आहे. शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांचे विचार कधीही थांबवू देणार नाही, पुरोगामी विचार पुढे नेणार असल्याची ग्वाही शेकाप राज्य मीडिया अध्यक्षा तथा प्रवक्त्या तसेच पीएनपी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी दिली. शेकाप नेते जयंत पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, अलिबागसह ग्रामीण भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, म्हणून 2017 मध्ये पीएनपी नाट्यगृह उभारण्यात आले. सहकार तत्त्वावरील उभारण्यात आलेले पीएनपी नाट्यगृह महाराष्ट्रातील पहिले नाट्यगृह आहे. पीएनपी नाट्यगृह अलिबागकरांसाठी उत्सव होता. परंतु, मागील तीन वर्षांपूर्वी 2022 साली एक दुर्घटना घडली. त्यामुळे अनेक कलाकारांसह नाट्यप्रेमींनी दुःख व्यक्त केले. कलाकारांसह नाट्यप्रेमींना उभारी देण्यासाठी शेकापचे नेते पुन्हा खंबीरपणे उभे राहिले. नाट्यगृह पुन्हा बांधणार, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. दिलेला शब्द भाईंनी पाळला. आज मोठ्या दिमाखात अद्ययावत असे नाट्यगृह पुन्हा उभे राहिले आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
नाट्यगृहाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार : प्रदीप नाईक
आज शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा वाढदिवस आहे. सणापेक्षा कमी नाही, असा हा आजचा आनंदाचा दिवस आहे. जयंत पाटील यांच्या वाढदिवसाबरोबरच पीएनपी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन हा दुग्धशर्करा योग आहे. सहकार तत्त्वावरील महाराष्ट्रातील पहिले नाट्यगृह पुन्हा उभे राहिले आहे.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेनंतर कलाकारांसह नाट्यप्रेमींनी हळहळ व्यक्त केली होती. अनेकांना दुःख झाले होते. पुन्हा नाट्यगृह उभे करेन, असा शब्द जयंत पाटील यांनी त्यावेळी दिला होता. जयंत पाटील कामाला लागले. अथक परिश्रमातून सर्व सोयी-सुविधांयुक्त अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्यात आले आहे. त्यासाठी चित्रलेखा पाटील यांनीदेखील मेहनत घेतली आहे. नाट्यगृहाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याचा आनंद आहे, असे शेकाप राज्य कामगार आघाडी प्रमुख तथा जयंतभाई पाटील अभिष्टचिंतन सोहळा समितीचे अध्यक्ष प्रदीप नाईक म्हणाले.