| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल कंपनीमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये स्थानिकांसह प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीच्या वतीने गुरुवार (दि.26) पासून गेल कंपनी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरू केला आहे. कंपनीसमोर एकत्र येऊन प्रकल्पग्रस्त, स्थानिक आणि महिलांनी काम बंद आंदोलन केले आहे. या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कामावर जाणे सर्वांनीच बंद केल्याचा फटका कंपनीच्या कामावर बसला.

निलेश गायकर, गजानन पाटील, निखील पाटील यांच्यासह असंख्य प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळी आठ वाजल्यापासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर प्रकल्पग्रस्त, स्थानिक जमण्यास सुरुवात केली. काम बंद आंदोलनाच्या आवाहनला स्थानिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी कामावर जाणे टाळले. त्यामुळे कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कामांवर त्याचा फटका बसला. कामगार कंपनीत कामाला आले नसल्याने कंपनी प्रशासनाची तारांबळ उडाली. हे आंदोलन होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कंपनी प्रशासनाने प्रयत्न केले. परंतु, प्रकल्पग्रस्त, स्थानिकांच्या एकतेने हा लढा पहिल्या दिवशी यशस्वी ठरला. दरम्यान कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बॅरिकेट बसविण्यात आले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवण्यात आला आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याबरोबरच कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी कवडी मोल भावाने जमीनी दिल्या. त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. प्रकल्पग्रस्त, स्थानिकांना प्राधान्याने नोकरी कंपनी प्रशासनाने दिली पाहिजे. ही भुमिका घेत प्रकल्पग्रस्तांनी हा लढा सुरु केला आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरु राहणार असल्याचे निलेश गायकर यांनी सांगितले.
गेल कंपनीला आर्थिक फटका
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीच्या वतीने गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या कंपनीत पाच हजारहून अधिक कामगार काम करीत आहेत. बोटावर मोजण्या इतके स्थानिक असून बाहेरील राज्यातील कामगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे स्थानिकांना नोकरी द्या या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त, स्थानिक व महिलांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनीत कामाला कामगार हजर न राहिल्याने कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला. एका दिवसात कंपनीला 20 ते 25 कोटी रूपयांचा फटका बसला असल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली.







